'देवदास'नंतर 24 वर्षांनी शाहरुख अन् भन्साळी एकत्र; 'ही' धमाकेदार कथा मोडणार Dhurandhar 2 चे सगळे रेकोर्ड?
जयदीप मेढे April 15, 2026 01:43 PM

Bollywood: बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मोठी सिनेमॅटिक जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.‘देवदास’सारखी कल्ट फिल्म देणारी शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी (Shahrukh Khan Sanjay Leela Bhansali) यांची आयकॉनिक जोडी तब्बल 24 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहे. या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या नव्या रोमँटिक ड्रामामुळे बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंतिम टप्प्यात चर्चा; शाहरुखचा वेगळा प्लॅन

2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’सारख्या ॲक्शन ब्लॉकबस्टरमधून बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या शाहरुख खानचा आता काहीतरी वेगळं करण्याचा मूड दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख आणि संजय लीला भन्साळी यांच्यात या नव्या प्रोजेक्टबाबत बराच काळ चर्चा सुरू होती आणि आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माहितीनुसार, शाहरुख आता आपल्या वयानुसार अधिक परिपक्व भूमिका साकारण्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे या चित्रपटात तो 50 वर्षांवरील एका मॅच्युअर व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजतं.

काय असेल चित्रपटाची कथा?

भन्साळी यांच्या या  रोमँटिक ड्रामामध्ये शाहरुख एका अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, ज्याचं करिअर कठीण टप्प्यातून जात असतं.आयुष्यातील या संघर्षमय काळात त्याची भेट एका स्टार्टअप चालवणाऱ्या महिलेबरोबर होते. ओळख वाढत जाते आणि दोघांमध्ये प्रेम फुलतं… पण पुढे त्यांच्या नात्याला कोणती वळणं मिळतात, हेच या चित्रपटाचं मुख्य आकर्षण असणार आहे.

आधीही झाली होती चर्चा, पण…

याआधीही संजय लीला भन्साळी शाहरुखसोबत एका प्रोजेक्टसाठी उत्सुक होते, मात्र काही कारणांमुळे तो प्रोजेक्ट झाला नाही. आता मात्र ही नवी फिल्म प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी जर ही जोडी पुन्हा एकत्र आली, तर ‘धुरंधर 2’सारख्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडण्याची  शक्यता आहे. चाहत्यांसाठी ही बातमी म्हणजे एकप्रकारे सिनेमॅटिक ट्रीटच ठरणार आहे.

2002 साली प्रदर्शित झालेला 'देवदास' हा सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक मानला जातो. आजही तो एक लोकप्रिय चित्रपट आहे. भन्साळींनी 'देवदास'मध्ये आपले सर्वस्व गुंतवले होते. हा चित्रपट अंदाजे 50 कोटी रुपयांमध्ये बनला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटी रुपयांची कमाई केली.या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांसारखे दिग्गज कलाकार होते. देवबाबू साकारल्यानंतर आता शाहरुख आणि भन्साळी काय घेऊन येतात याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.