कोट्यवधीचा खर्च वाया
esakal April 15, 2026 10:45 PM

खारघर, ता. १५ (बातमीदार) : सेक्टर दोनमधील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानासाठी कोट्यवधी खर्च गेलेला निधी वाया गेला आहे. महापालिका प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

खारघर सेक्टर दोनमधील भूखंड क्रमांक आठ या ठिकाणी सिडकोने सुसज्ज उद्यान उभारले आहे. मात्र, पालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. उद्यानात देखरेख केली जात नसल्यामुळे पाण्याअभावी हिरवळ जवळपास नाहिशी झाली आहे, तर पथदिव्यांनी मान खाली केली आहे. पालिकेने उद्यानात लहान मुलांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी भाजीपाला, फळ आणि त्यापासून मिळणारे जीवनसत्व यासंदर्भात माहिती देणारे फलक लावले आहेत. मात्र, उद्यानात पदपथालगत वीजपेटी उघड्या अवस्थेत असल्यामुळे लहान मुलांना खेळताना काळजी घ्यावी लागते. तसेच उद्यानांच्या एका बाजूला स्वच्छतागृह आहे. मात्र, त्यालगत असलेले पथदिवे बंद आहेत. तसेच स्वच्छतागृहाच्या दर्शनी भागात महिला-पुरुष असा उल्लेख नसल्यामुळे भीती वाटत असल्याचे उद्यानात आलेल्या नागरिकांनी सांगितले.

उद्यानात लागवड केलेली रोपे कोमेजून पडली आहे, तर टाईल्स निखळल्याचे दिसून येते. उद्यानातील खेळणी असलेल्या परिसरात पुरेसे पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या भीती वाटत असल्याचे महिलांनी सांगितले.

लहान मुलांसाठी उद्यान धोक्याचे
पनवेल पालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी खारघर सेक्टर १० मधील भूखंड क्रमांक २३० मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून उद्यान विकसित करताना पदपथालगत सुंदर पथदिवे लावले. त्या वेळी रहिवाशांनी पालिकेचे कौतुक केले होते. मात्र, दोन वर्षांत पदपथ गायब झाले असून, केवळ पथदिव्याचे सांगाडे उभे असून, टोकदार खिळे बाहेर आले आहेत. धावताना पाय घसरून पडल्यास मोठी इजा होऊ शकते. पालिका प्रशासन मुले जखमी होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने उद्यानात खेळण्यासाठी मुलांची गर्दी असते. मात्र, पथदिवे मोडकळीस आले आहेत. चालताना अथवा धावताना तोल जाऊन पथदिव्याच्या सांगाड्यावर पडल्यास मोठी दुखापत होऊ शकते. पालिकेने पथदिवे तत्काळ दुरुस्ती करावे अन्यथा ते काढून घ्यावेत.
- प्रकाश ठाकूर, रहिवासी, सेक्टर १०

उद्यानात नागरिक विरुंगळ्यासाठी जातात. उद्यान विभागाने याकडे लक्ष देवून उद्यानातील समस्या तत्काळ दूर करावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल.
- सोनल नवघरे, नगरसेविका

सेक्टर २ मधील स्वच्छतागृहातील समस्या निवारणासंदर्भात स्वच्छता विभाग आणि पथदिव्यांसंदर्भात विद्युत विभागाला माहिती देण्यात आली आहे. तसेच उद्यानात पाणीसमस्या आहे. एसटीपीच्या माध्यमातून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- नानासाहेब कामठे, उपायुक्त, पनवेल महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.