IMD Weather Update : गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाचा महाराष्ट्राला हादरवणारा इशारा, या भागामध्ये सुट्टी जाहीर
Tv9 Marathi April 15, 2026 10:45 PM

महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहेत. मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातच 18 आणि 19 एप्रिल रोजी पावसाची देखील शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.  भारतीय हवामान विभाग (MID) ने दिलेल्या इशाऱ्यानुसार  राज्यात पुढील चार दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.  विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून, दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि थेट उन्हात जास्त वेळ न थांबणे, या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उष्माघाताच्या घटनांना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात एक दिवसाची सुट्टी  

दरम्यान दुसरीकडे  वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना गुरुवारी 16 एप्रिल रोजी एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असून, तापमान 43 ते 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून देखील वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.