Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक
esakal April 16, 2026 02:45 AM

पुणे - उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खराडी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

सागर दत्तात्रेय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), रूपेश शिवाजी गावडे (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२, सर्व रा. लोणीकंद) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी व्यावसायिकाने (वय ४०, रा. गहुंजे, मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिकाची आरोपी झुरुंगे आणि त्यांच्या इतर साथीदारांशी ओळख झाली होती. खडी क्रशर व्यवसायासाठी तुम्हाला जागा दाखवितो, असे सांगून आरोपींनी या व्यावसायिकाला मंगळवारी (ता. १४) खराडी आयटी पार्क परिसरात बोलावून घेतले. दुपारी बाराच्या सुमारास एका हॉटेलजवळून आरोपींनी त्यांना जागा दाखविण्याच्या बहाण्याने मोटारीत बसवले.

त्यानंतर त्यांना एका अज्ञात ठिकाणी नेऊन मारहाण करत ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच, पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी सायंकाळी त्यांना खराडी परिसरात सोडून पळ काढला. घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पसार झालेल्या पाचही आरोपींना शिताफीने अटक केली. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.