हिंगोली - हिंगोली शहरात वाढत्या उष्णतेचा गंभीर परिणाम दिसून येत असून, यंदाच्या उन्हाळ्यातील पहिला बळी गेल्याची घटना समोर आली आहे. 30 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली बसस्थानक परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
सोशल मीडियावर मृतदेहाचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर मृताची ओळख पटली. मृत तरुण हा रफीक रेख उस्मान (वय 30, रा. अनसिंग, ता. औंढा नागनाथ) असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
उत्तरीय तपासणीनंतर डॉक्टरांनी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचा हा पहिला बळी ठरला आहे. दरम्यान, मृत रफीक रेख हे दोन दिवसांपूर्वी मुलांना सोडण्यासाठी हिंगोलीत आले होते. त्यानंतर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता.
हिंगोली शहरातील तापमान मागील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले असून, एप्रिल महिन्यातच तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सकाळी ११ नंतर शहरात उकाडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.