श्रीनिवास हेमाडे
वैदिक न्यायदर्शनाने वाद, जल्प आणि वितंड अशी तीन टप्प्यांत वादपद्धती मांडली. वादी व प्रतिवादी दोघांनी समपातळीवर प्रमाण व तर्क या साधनांच्या मदतीने संयमित चर्चा करणे हा वाद, तर जल्प म्हणजे स्वतः विजयी होण्यासाठी हेकेखोरपणा करून दुसऱ्याला हरवणे, आणि वितंड म्हणजे केवळ शब्दाला शब्द वाढवून बिनमुद्द्याचे निव्वळ भांडण करणे.
आयुर्वेदाचार्य चरक यांनी मात्र ही संकल्पना बदलली. त्यांच्या मते चर्चाविषयाची एक विशिष्ट परिभाषा असते. चर्चेच्या विषयाचे आणि तिच्या परिभाषेचे ज्ञान सर्वांना आहे, असे प्रारंभी गृहीत धरले जाते. तरीही दोन्ही वादी-प्रतिवादी पक्षांना आणि प्रश्न विचारणाऱ्या प्रेक्षकांना मान्य असणारी वादाची परिभाषा पुन्हा नव्याने तयार केली जाते. ही परिभाषा काही संकल्पनांनी बनलेली असते. या संकल्पनांना चरकसंहितेत ‘वादमार्ग’ म्हटले आहे. या संकल्पनांचे सखोल ज्ञान चर्चेतील सर्वांना, विशेषतः शहाण्या चर्चकास असलेच पाहिजे. या ४४ संकल्पना आहेत. १. वाद २. द्रव्य ३. गुण. ४ कर्म. .....४४. निग्रहस्थान. त्यांचा विशिष्ट क्रम असतो, तो बदलावायचा नसतो. या संकल्पनाच्या वर्णनाला ‘वाद परिभाषा’ असे म्हटले आहे. पहिली ‘वाद’ ही संकल्पना चर्चा करण्याची पद्धती म्हणून परिचित आहे.
वाद संकल्पना : चरकाचार्यांच्या मते, वादाचे दोन प्रकार होतात. जल्प आणि वाद (तत्र वादो नाम स यत् परेण सह शास्त्रपूर्वकं विगृह्य कथयतिI स च दिविधः संग्रहेण - जल्प: वितण्डा चI ). दोन्ही पक्षांनी- वादी व प्रतिवादी (पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष) यांनी आपल्या संबंधित विषयांचे योग्य, सुस्पष्ट विवेचन करणे, मांडणी करणे म्हणजे ‘जल्प’. आणि त्या विरुद्ध चर्चा झाली तर ती वितंडा (तत्र पक्षाश्रियायोर्वचनंजल्प: जल्प विपर्ययो वितण्डा ). समजा, ‘पुनर्जन्म’ हा विषय आहे. एकजण पुनर्जन्म मानतो आणि दुसरा नाकारतो. दोघेही आपापली बाजू मांडतात आणि एकमेकांचे दोष दाखवितात. ह्याला ‘जल्प’ म्हणायचे. आपली मांडणी करून झालेली नाही किंवा आपल्याला ती करायचीच नाही, पण दुसऱ्याचे केवळ दोषच दाखवायचे तर तिला ‘वितंडा’ म्हणतात. (वितण्डा नाम परपक्षे दोषवचनमात्रमेव ) या दोन प्रकारात वाद म्हणजे ‘जल्प’ अपेक्षित आहे आणि अर्थातच वितंडा अपेक्षित नाही! चरकाचार्यांनी न्यायदर्शनानुसारच्या जल्प आणि वितंडा हे दोन्ही टाळून जी सम्यक चर्चा होते त्या समग्र प्रक्रियेला चरकाचार्य ‘वाद’ म्हणतात. ‘न्यायदर्शना’ तील ‘वाद’ संकल्पनेची ताठर भूमिका ‘चरकसंहिते’ मध्ये चरकाचार्यांनी बदलून सौम्य व व्यापक केली.
वादमर्यादा : चर्चेच्या शेवटी आपला विजय झाला आणि प्रतिपक्षाचा पराभव झाला की, त्याविषयी लगेच बोलून दाखवण्याचा मोह होतो. पण तिथूनच पुन्हा बऱ्याचदा वितंडा होण्याची शक्यता असते. म्हणून तो मोह टाळून आपली भूमिका आपण यथार्थ व सार्थक रीतीने मांडली आहे, यावर समाधान मानून विजयप्राप्तीनंतर आपणच शांत राहिलो तर तर आणि तरच वादाला मर्यादा घालता येते. म्हणून ‘काय बोलावे व काय टाळावे’ याचे भान ठेवणे आणि त्याचवेळेस “तुमचा पराभव झाला, आता शांत रहा” असे म्हणावे किंवा म्हणू नये’; हेच मुळात ठरवावे की नाही, याचा शहाणा निर्णय घेणे म्हणजे ‘वादमर्यादा’ होय. (तत्रेदं वादमर्यादालक्षणं भवति -- इदं वाच्यम् इदमवाच्यम् एवं पराजितो भवतीति )
वादस्थल : वादस्थल म्हणजे ‘जेथे वाद घातला जातो, चर्चा केली जाते ती जागा’ असा अर्थ येथे नाही; ती जागा म्हणजे ज्ञानवती परिषद. येथे ‘वादस्थल’ म्हणजे ‘वादाचा मुद्दा’. वाद करताना युक्तिवादातील चर्चेच्या मुद्द्याची जागा म्हणजे वादस्थल. हा ‘वादाचा मुद्दा’ सोडून अन्य मुद्यावर चर्चा करावयाची नाही. वाद केवळ आणि केवळ वादस्थलीच करावयाचा; अन्यत्र नाही, तो मुद्दा संपला की पुढचा मुद्दा पुढच्या वादस्थली घ्यावयाचा. थोडक्यात, काटेकोर शिस्तबद्ध रीतीने वरील सर्व नियम पाळून केवळ सार्थक वाक्यांनी बनलेल्या युक्तिवादाची मांडणी करून चर्चा केवळ वादस्थलावर करणे म्हणजे वाद, असे चरकाचार्य नमूद करतात.
वादाचा कालखंड : साधारणपणे दोषदिग्दर्शन, दोषांचे निराकरण, त्यावर खुली चर्चा आणि अंतिम उभयमान्य सत्यनिष्ठा ही प्रक्रिया दोन्ही बाजूंनी, पक्ष-प्रतिपक्ष यांच्याकडून किमान आठ वेळा होणे अपेक्षित असते. अर्थात चर्चेच्या फेरी किती असाव्यात इत्यादी संख्येचे नियम नाहीत. शिवाय ही चर्चा एकाच दिवशी एकाच बैठकीत पूर्ण करावयाची, असाही नियम नाही. जोपर्यंत मांडलेल्या विषयातील सत्य सापडत नाही, तोपर्यंत चर्चा करावी, असा संकेत मात्र आहे. तो संकेत काटेकोरपणे पाळण्याची रीत आहे. तात्त्विक वाद अनेक तास, अनेक दिवस-महिने, वर्षानुवर्षे, शतकानुशतके चालू शकतात. आजही अशा चर्चा शुद्ध तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात चालतात.