मागोवा : ओर्बान यांच्या निरंकुश सत्तेला हंगेरीत सुरुंग
esakal April 16, 2026 09:45 AM

प्रज्ञा शिदोरे

डॅन्यूबच्या काठावर थंड वाऱ्यात, फडफडणाऱ्या झेंड्यांच्या पार्श्वभूमीवर एकच शब्द हवेत घुमत होता ‘आत्ता’! (NOW!). हे केवळ घोषवाक्य नाही; तर ते एका थकलेल्या लोकशाहीला पुन्हा गवसलेला श्वास होता. १६ वर्षांच्या अखंड सत्तेनंतर व्हिक्टर ओर्बान यांची राजवट कोसळली, आणि पीटर माग्यार यांच्या नेतृत्वाखाली हंगेरीने एक अनपेक्षित वळण घेतले. माग्यार यांचा तिसा पक्ष १९९ पैकी १३८ जागा जिंकला. पण ही केवळ निवडणुकीची कथा नाही; ही त्या समाजाची कहाणी आहे, ज्याने भीती आणि दडपशाहीच्या पलीकडे जाऊन स्वतःचा आवाज पुन्हा शोधला. हंगेरीच्या राजकारणात २०२६ ची निवडणूक ही फक्त सत्तांतराची घटना नाही; ती एका दीर्घकाळ उभ्या राहिलेल्या व्यवस्थेला दिलेला सामाजिक प्रतिसाद आहे.

ओर्बान यांनी सत्तेवर आल्यानंतर जवळजवळ सर्वच संस्थात्मक आधार खिळखिळे करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. न्यायव्यवस्था, माध्यमे, निवडणूक प्रणाली आणि सार्वजनिक संस्थांची स्वायत्तता हळूहळू कमी होत गेली. निवडणुकांचे विश्लेषण करताना आपण नेहमी सत्ताधाऱ्यांवर किंवा पक्षांवर लक्ष केंद्रित करतो; पण नागरिकांचा विचार किती करतो? एवढ्या निरंकुश आणि सर्वव्यापी वाटणाऱ्या सत्तेविरोधात मत द्यावे, असा निर्णय सामान्य मतदारांनी कसा घेतला असेल? ७४-७५ टक्के इतका प्रचंड मतदानाचा टक्का कसा साध्य झाला? नेमके काय बदलले होते? याचे उत्तर माग्यार यांच्या मोहिमेत आणि ओर्बान यांच्या भ्रष्ट व्यवहारात दडलेले आहे.

माग्यार यांनी केवळ विरोधाची भाषा वापरली नाही तर त्यांनी देशाला एक पर्याय दिला. दोन वर्षे अखंड देशभर फिरत, छोट्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत संवाद साधत त्यांनी मतदारांशी थेट नाते निर्माण केले. दिवसाला सात-सात सभा, ३०० किलोमीटरची देशव्यापी पदयात्रा ही केवळ राजकीय रणनीती नव्हती; ती विश्वास पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया होती. विरोधी पक्षाने विशेषतः हंगेरीमधील रोमा आणि ग्रामीण भागांतील मतदार, जे पारंपरिकरित्या ओर्बान यांच्या फिडेस पक्षाकडे झुकलेले होते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात माग्यार यशस्वी ठरले. त्यांनी त्यांना केवळ मतदार म्हणून नाही, तर कायम एक स्वतंत्र नागरिक म्हणून संबोधले. मतदारांनी माग्यार यांची निवड का केली, याची काही ठळक कारणे स्पष्ट दिसतात. पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे आणि ते म्हणजे भ्रष्टाचारावरील संताप. ओर्बान यांच्या कारकिर्दीत सत्तेचा वापर वैयक्तिक आणि व्यावसायिक फायद्यासाठी केला हे सर्वांना माहीत होते; पण त्यातून काही मार्ग दिसत नव्हता. माग्यार यांनी हाच एक मुद्दा उचलून मोठी सामाजिक घुसळण केली आणि व्यवस्थेमधील काही सोपे उपाय सुचवत त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवला. दुसरे म्हणजे आर्थिक अडचणी आणि प्रचंड असमानता. महागाई, रोजगाराच्या समस्या आणि स्थिरतेचा अभाव यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. तिसरे हे सार्वजनिक आणि शासनातील संस्थांवरील विश्वासाचा ऱ्हास. न्यायव्यवस्था, माध्यमे आणि प्रशासकीय यंत्रणा सत्तेच्या प्रभावाखाली आल्याची खात्री लोकांमध्ये ठळक दिसत होती. ओर्बान यांनी सत्तेत कायम राहण्यासाठी निवडणुकीच्या पद्धतीमध्ये मोठे बदल केले होते; पण हे बदल लोकशाहीच्या रेट्यामागे निष्प्रभ ठरले. चौथे म्हणजे माग्यार यांचा भूतकाळ. ते स्वतः एके काळी सत्ताधारी गटाचा भाग होते. त्यामुळे त्यांच्या टीकेला वेगळी विश्वसनीयता मिळाली. आणि पाचवे म्हणजे लोकांमधला लोकशाही तत्त्वांमधला विश्वास वाढवला. अनेक वर्षांनी लोकांना ‘मत देणं उपयोगाचे आहे आणि माझ्या मताने बदल घडू शकतो’, असे वाटायला लागले आणि म्हणूनच मतदानाचा टक्का अभूतपूर्व वाढला. तब्बल ७५ टक्के मतदान झाले होते; पण या विजयाचे ‘रोमँटीकरण’ करणे धोकादायक ठरेल. कारण सत्तांतर म्हणजे व्यवस्था बदलणे नाही. ओर्बान यांची ‘प्रणाली’ अजूनही जिवंत आहे. ती न्यायव्यवस्थेत, माध्यमांमध्ये, उद्योगजगतामध्ये आणि राजकीय संस्कृतीत रुजलेली आहे. त्यामुळे यांच्यासमोर आज प्रचंड आव्हाने आहेत. आर्थिक दबाव, लोकांच्या प्रचंड अपेक्षा, आणि पराभूत झालेल्या फिडेस पक्षाची अजूनही टिकून असलेली अनौपचारिक सत्ता. या सगळ्यांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. या निवडणुकीतून एक मोठा धडा मिळतो आणी तो म्हणजे, ‘राजवट कितीही मजबूत वाटली, तरी समाजातील असंतोषाचा साठा एक दिवस फुटतोच.’ लोकशाहीत अंतिम आवाज हा लोकांचाच असतो. म्हणूनच लोकशाही संस्था जपणं, त्यांना मजबूत ठेवणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. कधीकधी संवाद कठीण वाटतो, लोक दूर गेलेत असे वाटते पण हंगेरीमधला हा निकाल सांगतो की लोक ऐकत असतात. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचत राहणे गरजेचे आहे. आज अनेक लोकशाही देशांमध्ये अशी किंवा याहीपेक्षा जाचक परिस्थिती निर्माण झालेली आहे. इतकी वर्षे सत्तेत आहे, पण आता त्याला पर्याय काय, असे म्हणत बसण्यापेक्षा हंगेरीमधील विरोधी पक्षाने यातून मार्ग काढायची सुरवात केली. त्यामध्ये इथल्या नागरिकांनीही त्यांना साथ दिली. विरोधी पक्ष काम करत राहिला, पर्याय समोर उभे करत राहिला की ‘लोकशाही’ प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. आज याच कारणामुळे हंगेरीमधील ही निवडणूक अनेक गडबडलेल्या लोकशाही देशांसाठी एक आश्वासक उदाहरण ठरली आहे.

शेवटी, सर्वांत कठीण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ओर्बान यांच्या राजवटीने मागे सोडलेले राजकीय, कायदेशीर आणि नैतिक अवशेष खरेच दुरुस्त करता येतील का? लोकशाही पुन्हा उभी करणे हे निवडणूक जिंकण्यापेक्षा खूप मोठे काम आहे. आणि तेच माग्यार यांना आता करावे लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.