पुणे: पुणे शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर दीर्घकाळ उभी राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी, बेवारस किंवा वापरात नसलेली वाहने आता थेट जप्त केली जाणार आहेत. पुणे वाहतूक (Pune Traffic Update) पोलिसांकडून ही विशेष मोहीम बुधवार (दि. १५ एप्रिल २०२६) पासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान वाहतूक पोलिसांकडून महत्वाची पावले उचलली जाणार आहेत. सार्वजनिक रस्त्यांवर दीर्घकाळ उभी असलेली, धूळ खात पडलेली किंवा अयोग्य पद्धतीने पार्क केलेली वाहने शोधली जातील. संबंधित वाहनांवर नोटीस देण्यात येईल किंवा थेट नोटीस चिकटवली जाईल. नोटीस दिल्यानंतर ४८ तासांच्या आत पुढील कारवाई सुरू होईल. वाहन मालकाने २४ तासांच्या आत वाहन हटवले नाही, तर ते ‘बेवारस’ घोषित केले जाईल. अशा वाहनांना जप्त करून सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल. (Pune Traffic Update)
पुणे शहरातील रस्त्यांच्या कडेला दीर्घकाळ उभ्या ठेवलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांनी आता कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. अनेक वाहनमालक सूचना देऊनही आपली वाहने हलवत नसल्याने अशी वाहने ‘बेवारस’ म्हणून घोषित केली जात आहेत. यापुढे नोटीस देऊनही वाहन हलवले नाही, तर थेट जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Pune Traffic Update)
शहरातील प्रमुख मार्गांसह विविध भागांत रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ उभी असलेली, धूळखात पडलेली वाहने मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळे वाहतूक कोंडी वाढते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत संबंधित वाहनमालकांना प्रथम नोटीस बजावण्यात येणार असून, २४ तासांत वाहन न हलवल्यास ते बेवारस घोषित केले जाईल. त्यानंतर पुढील ४८ तासांत वाहन जप्त करण्यात येणार आहे.नजप्त करण्यात आलेल्या वाहनांवर महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहन परत मिळवण्यासाठी संबंधितांना दंड भरावा लागणार असून, नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिकांनीही अशा बेवारस वाहनांची माहिती ‘पीटीपी’ अॅपच्या माध्यमातून पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.(Pune Traffic Update)
महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बेवारस वाहनांसाठी स्वतंत्र ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, ती उचलण्यासाठी टोईंग व्हॅनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.