500 महिलांचे अश्लील व्हिडीओ, फोटो….अमरावतीनंतर आणखी मोठा भयंकर कांड; डेटिंग ॲपमध्ये…
Tv9 Marathi April 16, 2026 07:45 PM

Scam With Womens : सध्या अमरावतीतील तरुणींची फसवणूक आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. अयान तन्वीर नावाच्या 19 वर्षीय तरुणीने एकूण 180 पेक्षा जास्त मुलींची फसवणूक केल्याचा दावा केला जातोय. त्याच्याकडे अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ सापडले असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, या प्रकरणाची जगभरात चर्चा चालू असताना दुसरीकडे यापेक्षाही मोठा आणि हादरवणारा प्रकार समोर आला आहे. आनंद नावाच्या एका तरुणाने 500 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केली असून प्रेमाच्या जाळ्यात ओढून या महिलांची आर्थिक फसवणूक केली आहे. सोबतच काही महिलांचे त्याच्याकडे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ असल्याचेही धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना पश्चिम बंगाल राज्यातील आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव आनंद असे आहे. हा आनंद महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांची आर्थिक लूट करायचा. त्याने आतापर्यंत 500 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केल्याचा दावा केला जातोय. महिलांना फसवण्यासाठी तो मॅट्रिमोनियल साईट्स तसेच डेटिंग अॅपचा वापर करायचा. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. खोट्या नावाच्या मदतीने तो महिलांसोबत ओळख वाढवायचा आणि नंतर तो त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. त्याने आतापर्यंत महिलांकडून 2 कोटींपेक्षा जास्त रुपये लुबाडल्याचे सांगितले जात आहे.

प्रकरण नेमके समोर कसे आले?

आनंद कुमार याने वैभव अरोडा नावाचे एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका महिलेशी जवळीक वाढवली. त्यानंतर वैभव अरोडा नावानेच त्याने फेक इन्स्टाग्राम खाते सुरू केले होते. याच खात्याच्या माध्यमातून त्याने एका महिलेशी चॅटिंग सुरू केली. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरही ते बोलू लागले. माझ्या मित्राला पैशांची गरज आहे, असे सांगत त्याने या महिलेकडून पैसे घेतले. महिलेने पैसे परत मागितल्यावर त्याने ते परत देण्यास नकार दिला. महिलेने तक्रार देताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि हे प्रकरण समोर आले. दरम्यान, सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.