रात्री झोपण्यापूर्वी करा या 4 गोष्टी, तुमच्या शरीराला चांगल्या झोपेसोबतच मिळतील आश्चर्यकारक फायदे
Tv9 Marathi April 17, 2026 03:45 AM

आजच्या स्पर्धेच्या युगात काही लोकांसाठी एक चांगली व पूर्ण झोप घेणे हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. तणाव, मोबाईल फोनचा अतिवापर, अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी यांचा आपल्या आरोग्यावरच नव्हे, तर झोपेच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होत आहे. तर आपल्यापैकी अनेकजण तासंतास अंथरुणात पडून राहतात, तरीही त्यांना झोप लागत नाही किंवा झोपल्यावर सारखी जाग येत राहते. ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही थकल्यासारखे वाटते. म्हणूनतुम्हालाही शांत, गाढ झोप हवी असेल तर तुमच्या रात्रीच्या सवयींमध्ये काही बदल करणे आवश्यक ठरते.

खरं तर झोपण्याआधी केलेली छोटी कामे तुमचे शरीर आणि मन शांत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या सवयींमुळे तुमची झोप तर सुधारतेच, पण त्याचबरोबर तुमची मानसिक शांती, पचनक्रिया, प्रतिकारशक्ती आणि दुसऱ्या दिवसासाठीची ऊर्जा देखील लक्षणीयरीत्या वाढते. चला तर मग झोपण्याआधी तज्ञांनी शिफारस केलेल्या चार गोष्टी कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.

तज्ञांच्या मते चांगली झोप लागण्यासाठी मदत करणाऱ्या 4 गोष्टी

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर सोशल मीडियावर अनेकदा आरोग्य आणि फिटनेस टिप्स शेअर करत असतात. यावेळी त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये चांगली झोप हवी असल्यास झोपण्याआधी कोणत्या चार महत्त्वाच्या गोष्टी करायला पाहिजे ते सांगितले आहेत.

पाण्याची बाटली जवळ ठेवा

झोपताना नेहमी पाण्याची बाटली किंवा पाणी भरून पेला सोबत ठेवा. कधीकधी तुम्हाला अचानक जाग येते आणि थोड डिहायड्रेट झाल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत फक्त एक-दोन घोट पाणी प्यायल्याने शरीराला त्वरित आराम मिळतो आणि तुम्हाला सहजपणे पुन्हा झोप लागण्यास मदत होते. शिवाय काही लोकांना रात्री स्नायूंमध्ये पेटके येतात, जे बहुतेकदा डिहायड्रेटमुळे होतात. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने आणि रात्री गरजेनुसार थोडे पाणी प्यायल्याने ही समस्या टाळता येते. म्हणून चांगली झोप आणि शारीरिक संतुलनासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे महत्त्वाचे आहे आणि पाणी जवळ ठेवणे ही एक सोपी आणि प्रभावी सवय आहे.

तळपायांना तुपाचा मसाज आवश्यक

झोपण्याआधी तळपायांना तूप लावणे ही देखील एक चांगली सवय आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल तर हा उपाय विशेषतः उपयुक्त ठरू शकते. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या नाकात आणि घशात तुपाचे काही थेंब देखील टाकू शकता. यामुळे केवळ झोपच सुधारत नाही, तर नाक मोकळे होण्यासही मदत होते.

खडी साखर खाणे ही देखील एक चांगली सवय

तुम्हाला जर झोपायला त्रास होत असेल आणि तुम्ही सतत कुशी बदलत असाल तर खडी साखर यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी फक्त थोडीशी खडी साखर घ्या आणि तुमच्या तोंडाच्या एका बाजूला ठेवा. यामुळे केवळ झोपच सुधारत नाही, तर जर तुमचा घसा कोरडा पडला असेल, खोकला येत असेल तर हे फायदेशीर ठरते. यामुळे घशाला ओलावा मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

राजगिरा लाडू खाणे

पोषणतज्ञांच्या मते जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता. राजगिऱ्याचे लाडू खाणे झोप सुधारण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते, कारण त्यातील पोषक तत्वे शरीर आणि मन शांत करण्यास मदत करतात. राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅनसारखे घटक असतात जे शरीरातील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन या हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.