Saswad News : पोलिसांच्या तत्परतेमुळे माय-लेकीची कुटुंबाशी भेट
esakal April 17, 2026 03:45 AM

सासवड - सासवड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि झारखंड पोलिसांच्या मदतीने बोपदेव घाटात भरकटलेल्या ३५ वर्षीय महिलेची तिच्या चिमुकल्या मुलीसह कुटुंबाशी सुखरूप भेट झाली आहे.

भाषेचा अडथळा आणि घरचा पत्ता सांगता येत नसतानाही पोलिसांनी हे कठीण कार्य यशस्वीपणे पार पाडले. ७ एप्रिल रोजी बोपदेव डोंगररांगेत एक महिला तिच्या मुलीसह फिरत असल्याची माहिती कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने पोलिसांना दिली होती. या माहितीवरून हवालदार अविनाश होळकर व पथकाने माय-लेकीला ताब्यात घेतले.

या महिलेला मराठी भाषा येत नसल्याने ओळख पटविणे मोठे आव्हान होते. ओळख पटेपर्यंत त्यांना आंबोडी येथील जिव्हाळा वृद्धाश्रमात ठेवले होते. तेथे डॉ. संजीवकुमार भाटे आणि कर्मचाऱ्यांनी तिची काळजी घेतली. ही महिला तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र कर्मचाऱ्यांनी तिला संयमाने सांभाळले. महिलेकडे असलेल्या आधार कार्डच्या आधारे पोलिसांनी झारखंडमधील पूर्व सिंहभूम पोलिसांशी संपर्क साधला. तिथल्या पोलिसांच्या मदतीने नातेवाइकांचा शोध घेण्यात यश आले.

अखेर बुधवारी (ता. १५) सविता सरदार आणि तिच्या मुलीला पती अजय सरदार व बहीण दीपाली सरदार यांच्या स्वाधीन करण्यात आले. सासवड पोलिसांची संवेदनशीलता आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परराज्यातील ही महिला पुन्हा सुखरूप आपल्या कुटुंबात परतली आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सासवड पोलिस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.