पुणे - राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी पुणे शहर पोलिसांसमवेत ऑनलाईन आढावा बैठक घेत शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाढती सायबर गुन्हेगारी, अल्पवयीन गुन्हेगारी, त्यांचे पुनर्वसन आणि वाहतूक या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली. या बैठकीत तपासातील गती आणि दोषसिद्धी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि सर्व विभागांचे पोलिस उपायुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. शहरातील गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, नव्या ट्रेंड्स आणि प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर दाते यांनी मार्गदर्शन केले.
गुन्हे उघडकीस आणण्याचा वेग वाढविणे, तपास प्रक्रियेला अधिक गती देणे आणि दोषसिद्धीचा टक्का उंचावणे, यासाठी तपास यंत्रणांनी अधिक समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत केवळ कायदेशीर कारवाईपुरते मर्यादित न राहता त्यांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. समुपदेशन, शिक्षण आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहावे. नागरिकांना तातडीने मदत मिळेल यासाठी यंत्रणा सक्षम करावी, तसेच सर्वसामान्यांमध्ये पोलिसांची विश्वासार्ह आणि संवेदनशील प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, अशा सूचनाही दाते यांनी दिल्या.
परिमंडळ निहाय कामकाजाचा आढावा
पुणे पोलिस आयुक्तालयात अलीकडेच दोन नव्या परिमंडळांची भर पडल्याने शहरातील परिमंडळ संख्या सात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महासंचालक दाते यांनी स्वतंत्रपणे आढावा घेतला. गुन्हेगारीचे स्वरूप, स्थानिक अडचणी, मनुष्यबळ आणि तपासातील आव्हाने याची माहिती त्यांनी संबंधित पोलिस उपायुक्तांकडून जाणून घेतली. 'कामकाजात काही अडचणी आहेत का, आणखी कोणत्या बाबींमध्ये मदत अपेक्षित आहे?' अशी विचारणा करत त्यांनी अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला.