आगामी 2री आशियाई पॅसिफिक ज्युडो, तायक्वांदो, ग्रीको-रोमन (GR) आणि फ्रीस्टाईल (FS) कुस्ती स्पर्धेसाठीची 'ओपन नॅशनल सिलेक्शन ट्रायल्स' शुक्रवारी 17 एप्रिल 2026 रोजी डोंबिवलीत उत्साहात संपन्न झाली. डोंबिवली पूर्व येथील केडीएमसीच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात या चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते.
या निवड चाचणीमध्ये ज्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले आहे, त्यांची निवड कझाकिस्तान प्रजासत्ताक येथील करागांडा येथे होणाऱ्या दुसऱ्या आशियाई पॅसिफिक स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा 1 जून ते 7 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे.
सदर निवड चाचण्यांचे आयोजन 'ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ' च्या वतीने करण्यात आले होते. 'महाराष्ट्र स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ' कडे यजमानपद, तर डोंबिवलीतील 'ओंकार कर्णबधिर विकास संस्थे'कडे सह-यजमानपद सोपवण्यात आले होते. स्पर्धेचे तांत्रिक नियोजन व्हिक्टरी ज्युदो क्लब, कुस्तिगीर संघ कल्याण-डोंबिवली आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ ठाणे यांनी अत्यंत नेटकेपणाने हाताळले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला आमदार राजेश मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक करत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा नगरसेवक सुरज मराठे, माजी उपसभापती अमित म्हात्रे, व्हिक्टरी जुडो क्लबचे मॅथ्यू सर आणि लीना ओक मॅथ्यू यांनीही उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला.
या चाचण्यांमध्ये देशभरातून शेकडो खेळाडू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, यात कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत आणि पहिल्या आशियाई पॅसिफिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या अनुभवी खेळाडूंचाही समावेश होता. ज्युडो, तायक्वांदो आणि कुस्तीच्या आखाड्यात या खेळाडूंनी सादर केलेला खेळ उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिलतर्फे सुरेंद्र सिंग (ज्युडो), अमित भगत (तायक्वांदो) आणि रणवीर सिंग राहाल (कुस्ती) यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे भूपेंद्र पुनिया हे विशेष निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्वा मॅथ्यू लोकरे, आशुतोष लोकरे, नील मॅथ्यू, अक्षय पवार, राजेश भगत आणि अविनाश ओंबसे यांच्यासह व्हिक्टरी ज्युदो क्लबच्या स्वयंसेवकांनी मोलाचे श्रम घेतले. आता सर्वांचे लक्ष कझाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या या भारतीय संघाकडे लागले आहे.