त्याला नियम नीट समजावून सांगायला हवेत! BCCI च्या कारवाईपासून वैभव सूर्यवंशी वाचला; RR च्या टीम मॅनेजरसाठी शिक्षा ठरली
esakal April 17, 2026 08:45 PM

BCCI anti corruption rules dugout phone usage explanation: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा सामना सुरू असताना डग आऊटमध्ये बसून मोबाईल फोन पाहणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजर रोमी भिंदर यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली. १० एप्रिल रोजी गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल भिंदर यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

राजस्थानची फलंदाजी सुरू असताना भिंदर मोबाईल फोन पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांच्या बाजूला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी होता. BCCI च्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि स्पष्टीकरण देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, भिंदर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर BCCI ची एसीयू समाधानी नव्हती आणि त्यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून इशाराही देण्यात आला आहे.

देवाच्या कृपेने विनोद कांबळी आता ठीक; “कोण खोटी माहिती पसरवत आहे?” पत्नीचा खुलासा म्हणाली...

“गुवाहाटी सामन्यात रोमी भिंदर नियमांचे उल्लंघन करताना आढळला. आयपीएलच्या नियमांनुसार त्याला नोटीस बजावण्यात आली. त्याला आपली बाजू मांडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. त्याने आपले स्पष्टीकरण दिले, पण आम्ही त्याच्याशी फारसे समाधानी नाही. भ्रष्टाचारविरोधी पथकही त्याच्या उत्तराशी फारसे समाधानी नाही. हे त्याचे पहिलेच उल्लंघन असल्याने, नियमांनुसार त्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि भविष्यात अधिक काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे,” असे सैकिया यांनी सांगितले.

२००८ मध्ये लीग सुरू झाल्यापासून भिंदर कोणत्या ना कोणत्या भूमिकेत रॉयल्सशी जोडलेले आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटला (ACSU) तपासानंतर गंभीर शिक्षेस पात्र असे काहीही आढळले नाही आणि त्याला दंड व ताकीद देऊन सोडून दिले. त्यांच्या वैद्यकीय स्थितीमुळे मोबाईल वापर करणे आवश्यक होते, याची तपासकर्त्यांना खात्री पटली होती, असे अहवालात म्हटले.

Mumbai Indians Scenario: पंजाब किंग्सकडून दारूण पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्ले ऑफसाठी पात्र ठरतील का? जाणून घ्या गणित

"वैभव सूर्यवंशीबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. तो एक तरुण खेळाडू आहे आणि कदाचित फ्रँचायझी त्याला नियम अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकेल. एका तरुण खेळाडूला घाबरवण्यात काही अर्थ नाही," असे एका बीसीसीआय अधिकाऱ्याने म्हटल्याचे अहवालात नमूद केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.