निर्दयी आचाऱ्याने चिमुकल्याला थेट तंदुरमध्ये फेकलं; चूक फक्त एवढीच की… संतापजनक घटनेने देश हादरला
Tv9 Marathi April 17, 2026 08:45 PM

संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील छावनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आचाऱ्याने अत्यंत संतापजनक कृत्य केले आहे. एका लग्नसमारंभात एका निरागस मुलाने वारंवार रसगुल्ला मागितल्यामुळे केटरिंगचे काम करणाऱ्या आचाऱ्याने संतापून त्या मुलाला पेटलेल्या तंदूरमध्ये फेकले. यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुलगा चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत भाजला

बस्ती जिल्ह्यातील छावनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलौली गोसाई गावात लग्नसमारंभात ही संतापजनक घटना घडली आहे. दरम्यान ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. केवळ एक रसगुल्ला मागितल्याने आचाऱ्याने 11 वर्षीय मुलाला पेटत्या तंदूरमध्ये फेकले. तंदुरमधील आगीच्या ज्वाळांमुळे मुलगा चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत भाजला गेला. त्याला गंभीर अवस्थेत लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील दुर्जनपूर येथील रहिवासी असलेला 11 वर्षीय चमनच्या आईचे निधन झाले आहे, त्यामुळे तो आपल्या आजीकडे राहत होता. तो आपल्या आजीसोबत मलौली गोसाई गावात एका नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. .या लग्नात आनंदाचे वातावरण होते आणि चमन खेळत होता. खेळता खेळता तो जेवणाच्या ठिकाणी गेला आणि तेथे ठेवलेले रसगुल्ले खायला लागला. यामुळे आचारी संतापला.

आचाऱ्याचे संतापजनक कृत्य

चमन वारंवार रसगुल्ले मागत असल्यामुळे आचारी संतापला आणि त्याचा ताबा सुटला. त्याने मुलाला पकडून घाबरवले आणि नंतर त्याला उचलून पेटत्या तंदूरवर बसवले. यानंतर चमन थेट तंदूरमध्ये पडला. मुलाच्या किंकाळ्या ऐकून लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. तात्काळ नातेवाईकांनी त्याला बाहेर काढले, पण तोपर्यंत मुलाचे शरीर गंभीररीत्या भाजले होते. त्याला तातडीने अयोध्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर डॉक्टरांनी त्याला लखनऊला हलवण्याचा सल्ला दिला.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

या घटनेनंतर आरोपी आचारी घटनास्थळावरून फरार झाला. आता पीडित मुलाचा मामा देवीदीन निषाद यांनी आरोपी आचाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सर्कल ऑफिसर स्वर्णिमा सिंह यांनी सांगितले की, या घटनेत मुलगा आगीत भाजला गेला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.