नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ज्योती वाघमारे म्हणाल्या की मला वाटतं निसर्गानं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झालं आणि दिल्लीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली. मला वाटतं निसर्ग सुद्धा अश्रू ढाळतोय या सगळ्या घटनेवर, असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं. आम्हाला अपेक्षा होती, जेव्हा मातृशक्तीला अधिकार देण्याचा निर्णय असेल त्यावेळी सगळ्या पक्षांनी राजकारण बाजूला ठेवावं, राजकारणाच्या चपला बाहेर सोडाव्यात आणि सर्वसंमतीनं हे विधेयक मंजूर करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.पण विरोधक त्यांच्या कोत्या मानसकितेतून पडू शकले नाहीत, अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केली.
30 वर्ष झाली पण महिला आरक्षणासाठी तारीख पे तारीख मिळतेय. मात्र, महिला आरक्षण मिळत नाही. विरोधी पक्षांचं स्वत: चं राजकारण धोक्यात आल्यानं त्याच्यामुळं ते खोटा प्रपोगंडा आणि फेक नरेटिव्ह तयार करतात की घटना धोक्यात आली, असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं.त्या पुढे म्हणाल्याकी भारताचं संविधान हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च मानतात, त्यांनी वारंवार सांगितलं मला सर्व धर्मग्रंथांपेक्षा सुद्धा या देशाचं संविधान प्रिय आहे. विरोधकांनी मला उत्तर द्यावं या देशातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती केली होती. मिनी संविधान म्हणवली जाणारी दुरुस्ती कोणी आणली होती. कोणी या देशातील नागरिकांचे मुलभूत अधिकार फ्रीज करुन आणीबाणी आणली होती. कोण स्वत: ची निवडणूक सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं आणीबाणी आणली होती. आणीबाणी आणून भारतावर अन्याय केलेला हे जनता विसरलेली नाही, असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी काँग्रेसवर टीका केली.
विरोधकांनी भीती वाटली की महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता, एनडीएची लोकप्रियता वाढेल. विरोधकांना महाराष्ट्रात ट्रेलर बघितला होता, एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली, अडीच कोटी लाडक्या बहिणींना दर महिना ओवाळणी मिळाली, त्यामुळं थंपिंग मेजॉरिटी आतापर्यंतच्या इतिहासात मिळाली नाही ती मिळाली. विरोधकांना ती भीती स्वत:च्या खूर्च्या जातील अशी वाटली, त्यामुळं किळसवाणं राजकारण पाहायला मिळालं, अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केली.
ठाकरेंच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक फेटाळलं गेल्यानं दु:ख व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. हे दुटप्पी राजकारण समजायचं का? एका बाजूला तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतो असं म्हणता, महिला धोरण आणलं असं म्हणताय, महिलांना आरक्षण दिलं जात असेल, जागा वाढणार असेल, प्रत्येक राज्याचं प्रतिनिधीत्वाचं प्रमाण आहे तेवढंच राहणार आहे असं स्पष्टीकरण अमित शाह यांनी दिलं होतं. केवळ नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढेल आणि सर्वसामान्य महिला राजकारणात आल्या तर प्रस्थापितांचं राजकारण धोक्यात येईल वाटल्यानं हा प्रकार झालाय, असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं.