GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला
esakal April 18, 2026 02:45 AM

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Marathi Updates : शुभमन गिलने पुन्हा एकदा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्चस्व गाजवले.. कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांचा समाचार घेताना गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने मॅच विनिंग खेळी केली. कोलकाताच्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमनने अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयाचा पाया भक्कम केला आणि त्यानंतर मनातून हार पत्करलेल्या KKR कडून कोणताच संघर्ष पाहायला मिळाला नाही. अजिंक्य रहाणेचे सर्व डावपेच आज शुभमनने अपयशी ठरवले. शुभमनने आजच्या खेळीसह IPL 2026 Orange Cap च्या शर्यतीत विराट कोहलीला धक्का दिला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाताचा संपूर्ण संघ १८० धावांत तंबूत परतला. कॅमेरून ग्रीनने ५५ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. तो २०व्या षटकात राशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर रोव्हमन पॉ़वेल ( २७), टीम सेइफर्ट ( १९) व रमनदीप सिंग ( १७) हे KKR साठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले. ग्रीनने चौथ्या व पाचव्या विकेटसाठी पॉवेल व अनुकुल रॉय यांच्यासह अनुक्रमे ५५ व ६० धावांची भागीदारी केली.

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

GT च्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत कोलकाताच्या ५ फलंदाजांना ३२ धावांत माघारी पाठवून चांगले पुनरागमन केले. २०२२ नंतर कागिसो रबाडाने प्रथमच एका डावात ( ३-२९) तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज व अशोक शर्मा यांनी प्रत्येकी दोन, तर प्रसिद्ध कृष्णा व राशीद यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. GT ला साई सुदर्शन ( २२) व शुभमन यांनी ५७ धावांची सलामी दिली. त्यानंतर त्याने जॉस बटलरसह ( २५) चांगला खेळ केला. २ विकेट्स पडल्यानंतर शुभमनने सर्व सूत्र हाती घेताना २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

गुजरातने १० षटकांत २ बाद ९९ धावा फलकावर चढवल्या होत्या. शुभमन शतकाच्या जवळ पोहोचला होता आणि तो शतकासह संघाचा विजय हे दुहेरी निर्धार घेऊन मैदानावर फटकेबाजी करताना दिसला. शुभमन आयपीएल २०२६ मधील Orange Cap च्या शर्यतीत २३३* धावांसह अव्वल स्थानी पोहोचला. त्याने विराट कोहलीला ( २२८) मागे सोडले. या यादीत हेनरिच क्लासन ( २२४), रजत पाटीदार ( २२२) व इशान किशन ( २१३) हे अव्वल पाच मध्ये आहेत. वैभव सूर्यवंशी ( २००) नवव्या क्रमांकावर घसरला.

शुभमन आणि वॉशिंग्टन सुंदर ( १३) यांनी ३२ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी केली आणि त्यांच्या या भागिदीराने कोलकाताकडून सामना पूर्णपणे हिसकावून नेला. शुभमन ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८६ धावांवर झेलबाद झाला. कॅमेरून ग्रीनने अफलातून झेल टिपला आणि गुजरातला अजूनही १८ चेंडूंत २३ धावा हव्या होत्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.