इचलकरंजी : मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असतांना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मंत्री बावनकुळे आज सागंली दौ-यावर होते. त्यावेळी इचलकरंजीतील हाळवणकर समर्थक असलेल्या भाजपच्या नगरसेवक, नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने त्यांची सांगलीतील सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. अशोक स्वामी, तानाजी पोवार आदींनी भूमिका मांडतांना हाळवणकर यांनी केलेला त्याग आणि पक्षासाठी दिलेले योगदान याची मांडणी केली.
गेल्या विधानसभा निवडणूकीवेळी इचलकरंजीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा दिलेला शब्द आपण पूर्ण करावा, अशी सर्वानी एकमुखी मागणी त्यांच्याकडे केली. आपले १९९२ पासून हाळवणकर यांच्याशी मैत्री आहे. त्यांच्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. अत्यंत व्यस्त दौरा असतांनाही त्यांनी तब्बल १५ मिनिटे शिष्टमंडळाला दिली.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक - निंबाळकर, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह अशोक स्वामी, तानाजी पोवार, अजीत जाधव, मनोज हिंगमीरे, मारुती पाथरवट, शहाजी भोसले, दिलीप मुथा, मनोज साळुंखे, जहाँगीर पटेकरी, रुपा बुगड, विद्या साळुंखे, सुरेखा जाधव, अरुणा बचाटे, मनिषा नवनाळे, विजया महाजन आदींचा समावेश होता.