सृजनधारा : विनोदाची 'समय'रेषा
esakal April 18, 2026 10:45 AM

मंदार कुलकर्णी

आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ, हिंसाचार असलेल्या वेब सिरीज, चित्रपट फ्लॉप व्हायला पाहिजेत; पण प्रत्यक्षात त्यांना प्रतिसाद जास्त मिळतो, हेच खरं तर आक्षेपार्ह आहे.

प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं सभागृह आणि समोर कॅज्युअल ड्रेसमध्ये बसलेला एक तरुण. हातात स्क्रिप्ट नाही, की समोर टेलिप्रॉम्प्टर नाही. बोलण्यात एकसुद्धा चूक न करता, न अडखळता तो बोलत राहतो. बोलण्यात अर्थातच काही विशिष्ट आक्षेपार्ह शब्द आहेत, थट्टा आहे, ‘रोस्टिंग’ आहे आणि काही जणांची उघडपणे घेतलेली नावं आहेत; पण तो अक्षरशः स्टेज गाजवतो. त्याच्या करिअरचं विमान ज्या वादामुळे अक्षरशः कोसळून पडलं, त्याविषयी तो तुफान बोलत राहतो. एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर बेमालूमपणे वळत, पंचेसची बरसात करत आणि टायमिंगची कमाल दाखवत तो बोलत राहतो. त्याच्या या बोलण्याचा व्हिडिओ तो स्वतःच्या यूट्युब चॅनेलवर टाकतो आणि त्याला व्ह्यूज मिळतात तब्बल पावणेपाच कोटी.

...ज्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ म्हणजे ‘आयजीएल’ या शोमुळे लोकांनी ज्याला प्रचंड नावं ठेवली, ज्याच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले, त्या कॉमेडियन समय रैनाचा सध्या तुफान गाजत असलेला हा व्हिडिओ. मुळात वाह्यात, आक्षेपार्ह भाषेसाठी, अवयवसूचक विनोदांसाठी ‘प्रसिद्ध’ असलेला हा शो होता. त्यात रणबीर अलाहाबादी या युट्यूबरनं एक अतिशय वाईट, वादग्रस्त प्रश्न विचारला आणि त्यावरून गहजब उडाला. समयला तो शो गुंडाळावा लागलाच; पण त्याचं नाव ‘कुप्रसिद्ध’ही झालं. पूर्ण बदनाम झालेला हा समय जवळजवळ वर्षभराच्या नैराश्यपूर्ण ब्रेकनंतर युट्यूबवर आला आहे. ‘स्टिल अलाइव्ह’ असंच नाव त्यानं आपल्या व्हिडिओला दिलं आहे; पण मुद्दा आहे तो वेगळाच. समय रैनाचा हा व्हिडिओ सुपरहिट का झाला; ज्या भाषेबद्दल गहजब झाला होता, ती भाषा फार बदललेली नसतानाही प्रेक्षकांच्या पुन्हा त्यावर उड्या का पडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वादग्रस्त शोचा दुसरा सीझन आणण्याचा आत्मविश्वास त्याला कुठून वाटतो आहे, हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. समाज म्हणून आपण दुहेरी जीवन जगतो का, असा प्रश्न त्याच्या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादामुळे उपस्थित झाला आहे.

समयचा ‘आयजीएल’ शो बंद होण्यापूर्वी त्याला असेच कोटींमध्ये व्ह्यूज मिळत होते, त्याचे रील्स सगळीकडे फिरत होते. हे व्हिडिओ चवीनं बघणारे आणि नंतर मात्र वाद चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांच्याबाबत आक्षेप घेणारे लोक वेगळे होते का? शिवाय, वर्षभरानंतर समयनं पुनरागमन केल्यावर त्याला प्रतिसाद देणारे हे लक्षावधी, कोट्यवधी लोक कोण आहेत?

या प्रश्नांची उत्तरं खरं तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत. आपण फक्त ‘हिपोक्रसी’ नावाच्या वृत्तीचं दर्शन घडवत आहोत. समयच्या ताज्या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादामुळे अनेक गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. एक म्हणजे आक्षेपार्ह भाषा कुठली हे तुम्ही तिच्याकडे कुठल्या नजरेनं बघताय, आणि तुम्ही सध्या कोणता ‘मुखवटा’ घेतला आहे यावर ठरतं. आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ, हिंसाचार असलेल्या वेब सिरीज, चित्रपट फ्लॉप व्हायला पाहिजेत; पण प्रत्यक्षात त्यांना प्रतिसाद जास्त मिळतो हेच खरं तर आक्षेपार्ह आहे. म्हणजे जोपर्यंत ‘अधिकृत’रित्या कुणी ‘आक्षेप’ घेत नाही, तोपर्यंत प्रेक्षक इंटरेस्ट घेऊन बघणार आणि ‘आक्षेप’ आलाच तर मात्र ‘काय हे भयानक?’ अशी भूमिका घेणार, हे विचित्र आहे.

समयनं ‘स्टिल अलाइव्ह’मध्ये असेच काही प्रश्न विचारले आहेत. ‘तुम्हाला कंटेंट आवडत नाही, तर मग तुम्ही बघत का आहात?’ असं त्यानं गंमतीत विचारलं आहे. ‘एका विनोदासाठी तुम्हाला इतकं सगळं करावं वाटतं का?’ हा त्याचा प्रश्नही भेदक आहे. ज्या कार्यक्रमांतला विनोद खेळीमेळीनं घ्यायचा, किंवा सोडून द्यायचा, तो तुम्ही ‘गांभीर्या’नं घ्यायला लागलात आणि गांभीर्यानं घेण्याचे प्रश्न मात्र हसण्यावारी नेऊ लागलात, तर दोष तुमचाआमचा आहे. विनोदाबाबत प्रेक्षक म्हणून आपलं नक्की मत आपल्याला स्वतःला तरी माहीत आहे का? सोशल मीडियावर तुम्ही ‘गुडी गुडी’ असता आणि व्हिडिओ, वेब सिरीज बघताना मात्र त्यातल्या ‘बॅडी बॅडी कंटेंट’ला प्रतिसाद देत असलात, तर चूक कुणाची?

‘समय’चा सव्वा तासाचा व्हिडिओ आपल्याला भरपूर हसवतो, विचार करायला लावतो आणि काही वेळा डोळ्यांत पाणीही आणतो... पण भाषा आणि ‘रोस्टिंग’ पूर्वीचंच आहे. त्यात फार काही बदल न करता ‘मी आहे तसाच राहणार’ असं त्यानं सांगून टाकलं आहे. ‘स्टिल अलाइव्ह’वर कॉमेंट्सचाही पूर आला आहे आणि ‘आयजीएल’च्या पुढच्या सीझनसाठी तयारी पूर्ण झाली आहे. थोडक्यात, समयनं जिथून सुरुवात केली होती तिथंच येऊन त्यानं वर्तुळ पूर्ण केलं आहे. ...प्रेक्षक म्हणून तुम्ही तूर्त कुठला ‘मुखवटा’ धारण केला आहे, तो तुम्हाला तपासून बघायचा आहे इतकंच.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.