Phulambri News : शेतकऱ्यांच्या शेतातच मृत्यूचा सापळा..! लोंबकाळणाऱ्या वीजतारांनी वाढवला धोका; महावितरण विभागाचे दुर्लक्ष
esakal April 18, 2026 11:45 PM

फुलंब्री - तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे शेतकऱ्यांच्या शेतात जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली असून, खाली झुकलेल्या वीजतारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शेताच्या मधोमध अतिशय कमी उंचीवरून गेलेल्या या वीजवाहिन्यांमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान असे आढळून आले की, वीजतारा इतक्या खाली झुकल्या आहेत की शेतकरी उभे राहून सहज त्या ताऱ्यांच्या संपर्कात येऊ शकतात. काही ठिकाणी तर हात वर केल्यास तारा स्पर्श होण्याइतक्या जवळ असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतीची कामे करताना विजेचा धक्का बसण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. शेतात ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारखी यंत्रे वापरताना ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत आहे.

यंत्रांची उंची लक्षात घेता, वीजतारांशी संपर्क होण्याची शक्यता वाढली असून, त्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका कायम आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे तारा आणखी खाली झुकण्याची किंवा तुटण्याची शक्यता असल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचाही धोका आहे. या समस्येबाबत महावितरण विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

'आमच्या जीवाशी खेळ सुरू आहे. एखादा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?' असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, संबंधित वीजवाहिन्यांची उंची तात्काळ वाढवणे, तारा योग्यरित्या ताणून सुरक्षित करणे किंवा आवश्यक असल्यास खांबांची उंची वाढवणे यांसारख्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभागावर राहील, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

शेतामध्ये जाता येताना मोठ्या प्रमाणात विद्युत तारा लोंबकाळलेल्या आहेत. या विद्युत ताराचे विद्युत वितरण विभागाने पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्या गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात वादळी वाऱ्यात मोठा अनर्थ घडू शकतो.

- शेतकरी, शेलगाव खुर्द

फुलंब्री तालुक्यातील मानसून पूर्व कामासाठी पाच पथक तैनात करण्यात आलेले आहे. सुरुवातीला सब स्टेशनला जाणाऱ्या मेन लाईनची दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर सब स्टेशन हुन रोहितपर्यंत जाणाऱ्या तारेची दुरुस्ती. आणि त्यानंतर गावांतर्गत व शेतातील दुरुस्ती करण्यात येत आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात लोमकाळणाऱ्या तारा किंवा विद्युत पूल झुकलेले असल्यास आम्हाला माहिती द्यावी आम्ही दुरुस्त करू.

- विनोद ओहळ, उपअभियंता विद्युत वितरण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.