Doordarshan Veteran Passes Away: दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड
esakal April 18, 2026 11:45 PM

पुणे : दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर आपल्या सर्जनशीलतेची अनोखी मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि कवी अरुण काकतकर (वय- ७९) यांचे अल्पशा आजाराने पुण्यात शनिवारी निधन झाले. दूरदर्शनच्या वैभवशाली पर्वाला साक्षी असलेले आणि हा सुवर्णकाळ गाजविणारे काकतकर यांच्या निधनाने एका समृद्ध कलायुगाची अखेर झाल्याची हळहळ व्यक्त होत आहे.

काकतकर यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दूरदर्शनच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार आणि या काळावर अधिराज्य गाजविणारे व्यक्तीमत्त्व अशी काकतकर यांची खरी ओळख. दूरदर्शनमध्ये नोकरी करत असताना त्यांचे मुंबईतले घर अनेक मराठी कलाकारांचे मुंबईत उतरण्याचे हक्काचे ठिकाण होते. त्यांनी अनेकवर्ष दूरदर्शनमध्ये नोकरी केली. परंतु, १९७०-८० या दशकांत दूरदर्शनच्या सुवर्णकाळातले ते निर्माते होते. ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ‘सुंदर माझं घर’, ‘युवदर्शन’, ‘शब्दांच्या पलीकडले,’ अशा गाजलेल्या कार्यक्रमांची निर्मिती काकतकर यांनी केली. दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर काकतकर यांनी आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटविला. अनेक दर्जेदार संगीतमय कार्यक्रमांची, नाटकांची, लघुपटांची आणि चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन काकतकर यांनी केले. अनेक मराठी तरुण गायक-गायिकांना त्यांनी सुरवातीच्या काळात दूरदर्शनच्या कार्यक्रमातून संधी दिली. अनेक गाजलेल्या जाहिरातपटांचे दिग्दर्शन आणि काव्यरचना त्यांच्या होत्या.

दूरदर्शनच्या माध्यमातून सांगितिक कार्यक्रम काकतकर यांनी रसिकांपर्यंत पोचविले. सांस्कृतिक क्षेत्रातील नामांकित संस्थांना नावलौकिक मिळवून देण्यात काकतकर यांचा मोठा वाटा आहे. दूरदर्शनमध्ये असताना त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली आणि त्यानंतर १९८६ ते २००५ पर्यंत काकतकर यांनी ‘बालचित्रवाणी’चे निर्मिती उपप्रमुख, उपसंचालक म्हणून काम पाहिले. ‘बालचित्रवाणी’मध्ये त्यांनी जवळपास दहा वर्ष लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी वाहून घेतले.

काकतकर यांच्याकडे जुन्या दर्जेदार कार्यक्रमांच्या दुर्मिळ ध्वनिचित्रफितीचा संग्रह आहे. ‘नक्षत्रांचे दिवस’, ‘ठोसबोध’, ‘ठसे आणि ठोसे’, ‘आशयसूत्रे ओविले शब्द’, अशी त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. काकतकर यांनी दुरदर्शन, बालचित्रवाणी आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांची मनमुराद सेवा केली आणि लोकरंजन केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.