मुंबई : धावत्या लोकलमधून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर घडली. नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी दादरला जाणाऱ्या या तरुणाला वाटेतच काळाने गाठले.
३६ वर्षीय तेजस उदय पवार याचा हा दुर्दैवी अपघात कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडला. तेजस गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मध्य रेल्वेवर लोकलने प्रवास करत होते. दिव्यात कुटुंबीयांसोबत राहणारे तेजस एका महिला नातेवाईकासह दादर येथे निघाले होते. दादरमध्ये त्यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते आणि त्यामुळे अंत्यविधीसाठी ते तिथे जात होते. मात्र, नियतीने वेगळाच निर्णय घेतला.
लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे तेजस डब्यात आत शिरू शकला नाही. तो दाराजवळच उभा राहिला. गर्दीचा दबाव एवढा होता की, त्याचा हात सटकला आणि तो खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
Mumbai Chennai Trains: मुंबई-चेन्नई दरम्यान १६ विशेष गाड्या; सोलापूर विभागातील स्थानकांमार्गे धावणार, काेणत्या स्थानकांवर थांबणार?या घटनेची नोंद ठाणे लोहमार्ग पोलिसांनी घेतली असून, त्यांनी सविस्तर तपास सुरू केला आहे. अपघाताची कारणमीमांसा करण्यात येत आहे. गर्दीमुळे घडलेल्या या दुर्घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तेजससोबत असलेल्या महिला नातेवाईकाला मात्र त्यांचा पडण्याचा क्षण कळलाच नाही. त्या दादर रेल्वे स्थानकापर्यंत लोकलने पोहोचल्या. तिथे पोहोचल्यानंतरच त्यांना तेजस यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. या धक्कादायक बातमीने त्या स्तब्ध झाल्या. एकीकडे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तेजस यांचा स्वतःचा अंत्यविधी करण्याची वेळ आली, ही गोष्ट सर्वांनाच हेलावून टाकणारी ठरली.
रेल्वे प्रवासादरम्यान गर्दी ही नेहमीच धोक्याची ठरते, याचे हे एक भयानक उदाहरण आहे. दिव्यातील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तेजस याच्या अकाली निधनाने त्यांच्या परिवारात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू असताना, रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी अधिक काळजी घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Mumbai Crime: खेरवाडी प्रकरणात लव्ह एँगल! मुलीचा लग्नास नकार, निरजने प्रियकराचा काटा काढला; ६० तासात आरोपी गजाआड