Weather update : उद्या घराच्या बाहेर पडणं टाळा, राज्यावर मोठं संकट, IMD कडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट
Tv9 Marathi April 19, 2026 12:45 AM

एकीकडे राज्यात उन्हाचा कडका वाढत आहे, तर दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे.  हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार  पश्चिम महाराष्ट्र,  खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) या ठिकाणी काही प्रमाणात वादळी पाऊस पडण्याची शक्यात आहे. तर 22 एप्रिल रोजी पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.

कृषी  विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन 

दरम्यान राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत.  संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन, तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.  ⁠शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत,  काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्रीच्या झाकणाने झाकून टाकावीत. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ⁠ ⁠शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये, अशा सूचना हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

नंदूरबार जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट  

दरम्यान दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच हवामान खात्याकडून पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असली तरी उकाड्याची तीव्रता कायम राहणार आहे. दरम्यान, उद्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः सातपुडा आणि दुर्गम भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या भागात पाऊस होणार नाही, त्या ठिकाणी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.