SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral
esakal April 19, 2026 02:45 AM

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Marathi Updates: सनरायझर्स हैदराबादने २०-२५ धावा कमी केल्याने चेन्नई सुपर किंग्ससमोर तुलनने कमी आव्हानात्मक लक्ष्य उभे राहिले. पण, संजू सॅमनसला दुसऱ्या षटकात माघारी पाठवून नितीश रेड्डीने SRH ला यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर आयुष म्हात्रे ( Ayush Mhatre) नावाचे वादळ घोंगावले. त्याने १३ चेंडूंत ३० धावा चोपल्या.. हॅमस्ट्रिंग दुखापत होऊनही आयुष मैदानावर उभा राहिला.. तो आणखी उत्तुंग फटके मारेल असे वाटत असताना हेनरिच क्लासनने अफलातून झेल घेत त्याला माघारी पाठवले अन् CSK च्या धावगतीला ब्रेक लागला.

अभिषेक शर्माव ट्रॅव्हिस हेड यांच्या ७५ धावांच्या सलामीनंतर हैदराबादला धक्क्यामागून धक्के बसले. मुकेश चौधरीने दोन चेंडूंवर ट्रॅव्हिस हेड ( २३) व इशान किशन ( ०) यांना बाद करून चेन्नईला डोकं वर काढण्याची संधी दिली. बिनबाद ७५ वरून हैदराबादची अवस्था ४ बाद ११२ धावा अशी झाली होती. संजू सॅमसनने अचूक DRS घेत अभिषेकला माघारी जाण्यास भाग पाडले. त्याने २२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावा केल्या. त्यानंतर फक्त हेनरिच क्लासन चांगला खेळला.

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

या सामन्यात अभिषेकने आणखी एक विक्रम नावावर केला. आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंत २००० धावा करणाऱ्यांमध्ये तो दुसरा ठरला. या विक्रमात आंद्रे रसेल ( ११२०) अव्वल आहे, अभिषेकने ११९३ चेंडूंत दोन हजार धावा केल्या. त्याने निकोलस पूरन ( ११९८), विरेंद्र सेहवाग ( १२११) व ख्रिस गेल ( १२५१) यांचा विक्रम मोडला.

चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करताना हैदराबादल ९ बाद १९४ धावांपर्यंत रोखले. क्लासनने ३९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या. अंशुल कंबोज व जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी ३, तर मुकेश चौधरीने दोन विकेट्स घेतल्या. अंशुल या पर्वात सर्वाधिक १३ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आणि पर्पल कॅप त्याच्याकडे आली. हैदराबादने पहिल्या सहा षटकांत १२.५० च्या सरासरीने धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर ७ ते १५ व १६ ते २० षटकांत त्यांची सरासरी अनुक्रमे ८.७७ व ८ अशी कमी झाली.

संजू सॅमसनने ( ७) षटकाराने सुरुवात केली, पंरतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच तो माघारी परतला. नितीश कुमार रेड्डीला ही विकेट मिळाली. त्यानंतर आयुष म्हात्रेने SRH चा मागील सामन्यातील स्टार प्रफुल हिंगेच्या एका षटकात २४ धावा कुटल्या. साकिब हुसैनच्या पहिल्या षटकातही १३ धावा आल्याने CSK ने ४ षटकांत ६१ धावा फलकावर चढवल्या. पाचव्या षटकात आयुषच्या मांडीचे स्नायू दूखावले गेले आणि त्याला प्राथमिक उपचार घ्यावे लागले. त्यानंतरही आयुषने मैदानावर उभं राहण्याचे ठरवले.

पण, नितीश रेड्डीच्या पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने मिड ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू हेनरिच क्लासनने हवेत झेपावत टिपला. आयुष १३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर माघारी परतला. इशान मलिंगाने त्याच्या पहिल्या षटकात ऋतुराजला ( १९) माघारी पाठवून चेन्नईला ६६ धावांवर तिसरा धक्का दिला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.