'चॅम्पियन' वैशाली होणार का बुद्धिबळाची नवी राणी?
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई April 19, 2026 03:13 AM

Vaishali Rameshbabu News In Marathi : आजूबाजूला युद्धाचं वातावरण. युद्धामुळे निर्माण झालेला जागतिक पातळीवरचा तणाव. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपातल्या सायप्रसमध्ये सुरू होती बुद्धिबळातील मानाची कॅन्डीडेट्स स्पर्धा. याच स्पर्धेत भारताच्या वैशाली रमेशबाबूनं महिला गटातून विजेतेपद पटकावलं आणि एक नवा इतिहास घडवला.

भारतीय बुद्धिबळात सध्या युवा खेळाडू जोमानं पुढे येतायत. एक काळ होता जेव्हा भारतीय बुद्धिबळविश्व म्हटलं तर विश्वनाथन आनंद आणि महिला गटातून कोनेरू हम्पी ही दोनच नावं ओठावर यायची. पण गेल्या काही वर्षात प्रज्ञानंद, डी. गुकेश, दिव्या देशमुख, वैशाली रमेशबाबू या अवघ्या विशीतल्या बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर देशाची मान अभिमानानं उंचावली. कॅन्डीडेट्स स्पर्धेच्या पुरूष गटात भारताच्या हाती फारसं मोठं यश हाती लागलं नसलं तरी महिला गटातून मात्र वैशाली रमेशबाबू अव्वल ठरली.

युद्धाच्या परिणामांमुळे ग्रँडमास्टर कोनेरू हंपीनं स्पर्धेच्या काही दिवस आधी माघार घेतली. त्यामुळे महिला गटात भारताचं आव्हान डळमळीत झाल्याची चर्चा सुरू झाली. पण वैशालीनं सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय बुद्धिबळविश्वातील एका नव्या इतिहासाची नोंद केली. 14 फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत वैशालीनं पाच डाव जिंकले, दोन डावात पराभूत झाली तर सात डाव तिनं अनिर्णित राखले. 14 फेऱ्यांमध्ये एकूण 8.5 गुणांची कमाई करत तिनं विजेतेपद पटकावलं. कॅन्डीडेट्स स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात विजेतेपद पटकावणारी ती भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली.

21 जून 2001 साली जन्मलेली वैशाली ही तामिळनाडूच्या एका साध्या मध्यमवर्गीय घरातली. प्रज्ञानंद तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान. पण लहानपणी दोघंही भावंड भलतीच खट्याळ. त्यामुळे वडिलांनी त्यांना बुद्धिबळाची ओळख करून दिली. एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांनी सांगितलेला किस्सा असा, “हे दोघं लहानपणी खूप भांडायचे. त्यामुळे त्यांचं लक्ष एखाद्या सकारात्मक गोष्टीकडे वळावं म्हणून त्यांना बुद्धिबळ खेळायला शिकवलं.” पण वडिलांच्या याच एका चालीमुळे दोघा भावंडांची भविष्यात ‘ग्रँडमास्टर’ अशी ओळख बनली.

वैशाली आणि प्रज्ञानंद लहानपणी एकमेकांविरुद्ध खूप सामने खेळायचे. कधी वैशाली जिंकायची, कधी प्रज्ञानंद. पण सततच्या सरावामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला. बुद्धिबळ खेळातील सर्वात महत्त्वाचा गुण तो म्हणजे संयम त्यांच्या अंगात भिनला. वेगवेगळ्या रणनीती समजून घेतल्या. आणि त्यामुळेच घरातच इतकी मोठी स्पर्धा असल्यानं दोन्ही भावंडांना बाहेरच्या स्पर्धांना सामोरं जाणं कठीण गेलं नाही.

वैशालीनं 2012 साली युवा बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्यावेळी ती फक्त 11 वर्षांची होती. त्यानंतर ती महिला ग्रँडमास्टर बनली आणि मग इंटरनॅशनल मास्टर. 2023 मध्ये फिडे स्विस टूर्नामेंट जिंकून वैशाली कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. हाच तिच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉईंट मानला जातो.

वैशालीच्या या यशात तिच्या आई-वडिलांचं योगदानही मोठं आहे. बाहेरदेशातल्या स्पर्धांवेळी हे अख्खं कुटुंब सोबत असतं. कँडिडेट्स स्पर्धेवेळी वैशालीची आई नागलक्ष्मी तिच्या सोबत होती. स्पर्धा जिंकल्यानंतर वैशालीनं या यशात आईची मोलाची साथ लाभल्याची प्रांजळ प्रतिक्रिया दिली. प्रज्ञानंदनंही एका मुलाखतीत म्हटलं होतं “माझ्या यशात माझी आई ही ‘सायलेंट पिलर’ आहे.” परदेशात या दोन्ही मुलांचं खाण्यापिण्याचं वेळापत्रक, घरचं जेवण या सगळ्याची जबाबदारी नागलक्ष्मी उचलतात. त्यामुळे दोन्ही मुलांना खेळावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं.

आता कॅन्डीडेट्स स्पर्धा जिंकल्यानंतर वैशालीचं लक्ष्य असेल ते विश्वविजेतेपदाचं. कॅन्डीडेट्स स्पर्धेचा विजेता हा विद्यमान विश्वविजेत्याला आव्हान देतो. चीनची जू वेन्जून ही सध्याची विश्वविजेती आहे. तिच्याशी दोन हात करण्याआधी वैशालीला साधारण 8 ते 9 महिने तयारीसाठी मिळतील. त्यामुळे आता बुद्धिबळातील भारताची पहिली विश्वविजेती होण्याची वैशालीला रमेशबाबूला सुवर्णसंधी आहे.

एक गोष्ट खरी आहे... आयुष्यात संधी येते तेव्हा तिचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे. मेहनत, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेली धडपड कधीच वाया जात नाही पण त्यासाठी संयम हवा. वैशाली रमेशबाबूच्या यशाचं हेच खरं गमक आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.