Maharashtra Weather : चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचा पट्टा सक्रीय, राज्यात 'या' भागात मुसळधार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
esakal April 19, 2026 11:45 AM

Heavy Rainfall Alert Maharashtra : राज्यात पुढील काही दिवसांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असून २० ते २२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानाच्या अंदाजानुसार नियोजित करावीत आणि गारपीट व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांत जाणवणार असून पुणेविभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र २२ एप्रिलपासून पावसाच्या तीव्रतेत काहीशी घट होण्याचे संकेत आहेत.

दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून कमाल तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले आहे. वर्धा आणि अमरावती येथे ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला, गडचिरोली, नागपूर आणि वाशीम येथे ४४ अंशांपर्यंत पारा पोहोचला. या उष्णतेमुळे वातावरणात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

देशातही उष्णतेची तीव्रता वाढलेली असून उत्तर प्रदेशातील बांदा येथे ४५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सध्या उत्तर भारतात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत जाणवत आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा ते मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Update : उष्णतेपासून सुटका होणार! १९, २० ला जोरदार पावसाचा तज्ज्ञांचा अंदाज, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

दरम्यान, राज्यात सकाळपासूनच उकाडा जाणवत असून नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत विजांसह वादळी पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.