एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला आतापर्यंत 19 व्या मोसमात (IPL 2026) काही खास करता आलेलं नाही. सीएसकेला आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 2 सामन्यांतच विजय मिळवता आलाय. त्यामुळे टीम मॅनेजमेंटकडून चिंता व्यक्त केली जात आहे. चेन्नईचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे आधीच 6 सामन्यांना मुकावं लागलं आहे. धोनीचं लवकरात लवकर कमबॅक अपेक्षित आहे. अशात चेन्नईला मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. चेन्नईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे संपूर्ण 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीएसकेचे बॅटिंग कोच माईक हसी यांनी आयुषच्या दुखापतीबाबत काय माहिती दिली हे जाणून घेऊयात.
आयुषला हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली. आयुषला पाचव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर दुखापत झाली. आयुषला दुसरी धाव घेताना हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. आयुष कसाबसा धावत नॉन स्ट्राईकला (बॉलर बॉलिंग टाकतो ती बाजू) पोहचला. त्यानंतर आयुष जागेवर बसला. आयुषची स्थिती पाहून फिजीओ मैदानात आले आणि त्याला काय झालंय हे पाहिलं. आयुषने पुन्हा बॅटिंगला सुरुवात केली. मात्र आयुष अवघ्या काही चेंडूंनंतर आऊट झाला. आयुषला या दुखापतीमुळे हालचाल करणं अवघड झालं. आयुषला आऊट झाल्यानंतर रामाकृष्ण घोष आणि फिजिओ टीमने मैदानाबाहेर नेलं.
“आयुषला हॅमस्ट्रिंग दुखापत झालीय. मात्र आयुषला झालेली दुखापत गंभीर आहे री नाही? याबाबत आता काही सांगता येणार नाही. आयुषला झालेल्या दुखापतीचं निदान करण्यासाठी स्कॅन करण्यात येईल”, अशी माहिती सीएसके बॅटिंग कोच माईक हसी यांनी दिली.
“मी ठामपणे सांगू शकत नाही. मात्र आयुषला झालेली दुखापत पाहून परिस्थिती योग्य नाही. आयुष सातत्याने चमकदार कामगिरी करत असताना त्याला झालेली दुखापत ही टीमसाठी चिंताजनक आहे”, अशी भीतीही हसीने बोलून दाखवली.
दरम्यान आयुष म्हात्रे चेन्नईकडून 19 व्या मोसमात एकूण 6 सामने खेळला आहे. आयुषने या 6 सामन्यांत 201 धावा केल्या आहेत. आयुषने या दरम्यान 2 अर्धशतक झळकावलं. तसेच आयुषने 20 चौकार आणि 12 षटकारही लगावले आहेत. आयुषच्या दुखापतीबाबत हसीने चिंता व्यक्त करत त्याला काही सामन्यांला मुकावं लागणार असल्याचं संकेत दिलेत. त्यामुळे आयुषबाबत पुढील अपडेटकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.