एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
कुलदीप माने, एबीपी माझा April 19, 2026 08:43 PM

Maharashtra Weather News :  राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तर विदर्भात तापमाने 44 अंशाचा उच्चांक गाठला आहे. तर काही भागात पाऊस देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. तासगाव तालुक्यातील गोटेवाडी या ठिकाणी गारासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तासगाव, कवठेमहांकाळ भागासह सांगली शहरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सांगली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. तासगाव तालुक्यातील गोटेवाडी या ठिकाणी गारासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.  तासगाव, कवठेमहांकाळ कुपवाड भागासह सांगली शहरांमध्ये पाऊसास सुरुवात झाली आहे. गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच तासगाव तालुक्यात द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला आहे.

गडचिरोलीत उष्णतेचा कहर; 44 डिग्री तापमानात 

विदर्भात तापमानाचा पारा वाढला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 44 अंशांवर पोहोचला आहे. या कडाक्याच्या उन्हाचा फटका आता वीज यंत्रणेलाही बसतोय. आल्लापल्ली येथील 132 केव्ही उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर ओव्हरहिट होऊ नये म्हणून महावितरणने चक्क कुलरचा वापर सुरू केला आहे. वाढत्या लोडमुळे आणि उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. त्यामुळे भर उन्हात माणसांसोबत आता यंत्रांनाही कुलरची गरज भासू लागल्याचं चित्र गडचिरोलीत पाहायला मिळतंय.

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात जोरदार पाऊस

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात आज अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कडक उन्हाने त्रासलेल्या भोकर वासियाना या पावसामुळे काही वेळ का असेना दिलासा मिळाला आहे. उमरी हिमायतनगर देगलूर या तालुक्यात आता ढगाळ वातावरण तयार झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा पावसानंतर उन्हाचा त्रास जास्त होतो.

वाशिम  जिल्ह्यात तापमान वाढले, शाळांच्या वेळेत बदल

वाशिम  जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उन्हाचा पारा44 ℃ पर्यंत गेल्याने उष्णतेच्या लाटेचा फटका लहान मुलांच्या आरोग्यावर बसू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळेच्या वेळेत बदल केला आहे. 29 एप्रिल पासून शाळा सकाळी 7ते 11 या वेळेत भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.