IPL 2026: तीन आठवडे अन् ६ सामने झाले, तरी धोनी अजूनही मैदानात का उतरला नाही? CSK च्या कोचने अखेर सत्य सांगितलं
esakal April 20, 2026 12:45 AM

MS Dhoni Injury Marathi News: चेन्नई सुपर किंग्स संघाने (CSK) इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत. या ६ सामन्यांपैकी केवळ २ सामने चेन्नईने जिंकले आहेत. असे असतानाच चेन्नईचा सर्वात अनुभवी खेळाडू एमएस धोनीच्या गैरहजेरीची सध्या जोरदार चर्चा आहे.

धोनीला (MS Dhoni) आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पोटरीची दुखापत (Calf Injury) झाली होती. त्यामुळे तो साधारण दोन आठवडे स्पर्धेतून बाहेर असेल, याची माहितीही चेन्नईने दिली होती. पण आता तीन आठवडे झाले आहे, मात्र अद्याप धोनी खेळलेला नाही.

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

इतकेच नाही, तर तो या ६ सामन्यांमध्ये एकदाही स्टेडियमवरही दिसलेला नाही. धोनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईच्या संघासह हैदराबादला पोहचला होता. तसेच तो नेट्समध्येही सराव करत असल्याचे दिसले होते. त्यामुळे तो या सामन्यात शनिवारी (१८ एप्रिल) खेळेल, असे अनेकांना वाटले होते.

मात्र १० धावांनी चेन्नईचा पराभव झालेल्या या सामन्यातही धोनी खेळला नाही. त्यामुळे धोनी कधी खेळणार असे प्रश्न उपस्थित होत आहे. आता याबाबत चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसीने याबाबत उत्तर दिले आहे. त्याने म्हटले आहे की तो त्याची तंदुरुस्ती मिळवत असून तो लवकरच पुनरागमन करेल, अशी आशा आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर हसीने सांगितले, 'तो दुखापतीतून चांगल्याप्रकारे सावरत आहे. हे पाहा, मी फलंदाजी प्रशिक्षक आहे, आणि आत्ता तो जशी फलंदाजी करतोय, ते पाहून मी खूश आहे.' हसीने पुढे सांगितले की सध्या तो त्याचे 'रनिंग फिटनेस' मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण धावा घेण्यासाठी पळावे लागणार आहे. पण हसीने धोनी कधी पुनरागमन करणार, याबाबत स्पष्ट तारीख सांगितली नाही.

हसी म्हणाला, 'तुम्ही काल त्याची ट्रेनिंग पाहिली असेल, तर तो चांगली फलंदाजी करतोय. तो जशी फलंदाजी करतोय, त्यासाठी तो खूश आहे. पण तो सध्या त्याच्या धावण्यावरही लक्ष देत आहे. कारण तो डावाच्या शेवटी फलंदाजी करणार आहे. त्यामुळे त्याला एकेरी-दुहेरी धावा घाईत घ्याव्या लागतील, त्यामुळे त्याचा त्याच्या धावण्यावर विश्वास यायला हवा आणि तेवढा वेग असायला हवा. मला माहित नाही, तो कधी खेळणार आहे. पण ज्याप्रकारे चाहत्यांना आशा आगे, तशीच मलाही आहे की त्याने लवकर पुनरागमन करावे.'

Team India News: श्रेयस अय्यरच नव्हे, तर IPL 2026 मधील ५ स्टार खेळाडू भारताच्या ट्वेंटी-२० संघात करू शकतात पुनरागमन

यापूर्वी गेल्या १८ हंगामात धोनी आयपीएलच्या सुरुवातीला खेळला नाही असं कधी झालं नव्हतं. विशेष म्हणजे एकाच हंगामात ६ सामन्यांना मुकण्याचीही ही त्याची पहिलीच वेळ आहे. धोनी गेल्या १८ हंगामात सलग आयपीएलमध्ये खेळलेला दिसला आहे. त्याने आयपीएलमध्ये २७८ सामने खेळले असून ५४३९ धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षक म्हणून २०१ बळही घेतले आहेत.

दरम्यान, धोनी संघात परत आल्यास तो प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाच्या जागेवर खेळणार हे पाहावे लागणार आहे. सध्या धोनीच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे धोनीच्या पुनरागमनानंतरही कोण यष्टीरक्षण करताना दिसणार, हे देखील पाहावे लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.