धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
एबीपी माझा वेब टीम April 20, 2026 02:43 AM

Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एक मोठी अपघाताची घटना घडली आहे. तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्यात दोन मोठे स्फोट झाले आहेत. यामध्ये 16 महिलांसह 23 कामगांराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या अपघातात अनेकजण जखणी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. ही घटना विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी इथं घडली आहे. कालच तामिळनाडूच्या वलपराई येथे एक पर्यटक व्हॅन खड्ड्यात कोसळली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. अशातच आज पुन्हा एकदा मोठी अपघाताची घटना घडली आहे. 

मदतकार्य सुरु, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याकडून शोक व्यक्त

23 एप्रिल रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, सलग दुसऱ्या दिवशी एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी येथील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत किमान 23 कामगार ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या वृत्तानंतर, राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो: पोलीस

एका जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढले आहेत. आम्हाला भीती आहे की हा आकडा आणखी वाढू शकतो." पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आग लागली तेव्हा फटाक्यांच्या कारखान्यात सुमारे 30 कामगार काम करत होते. पोलिसांनी सांगितले की, स्फोटाच्या तीव्रतेमुळे इमारतीचा काही भाग कोसळला आणि संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

बचावकार्यादरम्यान दुसरा स्फोट - जिल्हाधिकारी

दरम्यान, विरुधुनगरचे जिल्हाधिकारी डॉ. एन. ओ. सुखपुत्र म्हणाले, "या घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या 23 मृतांपैकी 19 मृतदेहांची ओळख पटली आहे. यामध्ये 16 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे, तर सहा जखमी आयसीयूमध्ये आहेत. आम्ही बचावकार्य करत असताना दुसरा स्फोट झाला. परिणामी, पोलीस, आमचे अग्निशमन आणि बचाव पथक, महसूल विभागाचे पथक आणि बचाव कार्यात सहभागी असलेले स्वयंसेवक यांच्यासह सुमारे 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाला साहाय्य करण्यासाठी आणि बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आम्ही एफआयआर दाखल केला आहे. तपास सुरू आहे."

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.