बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (दरवाजाकडे धाव घेत) कित्ती वाट बघत होते मी!! मोस्ट वेलकम माय सन!! ये, ये...ये रे माझ्या विजयीवीरा...ये!! शाब्बास! अस्साच मोठा हो! मला कित्ती आनंद झालाय, म्हणून सांगू?
बेटा : (आत्मविश्वासाने डौलदार पावलं टाकत) थँक्यू! पक्षाच्या कार्यालयातही माझं जंगी स्वागत झालं! शाबासक्यांच्या थापा खाऊन खाऊन पाठ नुसती हुळहुळी झाली आहे!!
मम्मामॅडम : (दातओठ खात) चांगलीच जिरवलीस त्या नतद्रष्ट कमळवाल्यांची! नाहीतरी फार उडत होते! आता चांगले दात पडले ते बरं झालं! पुन्हा असली विधेयकं गळ्यात मारणार नाहीत!!
बेटा : (बेफिकिरीने) ते ठीक आहे...त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतंच! अर्थात ते आपल्याकडेही नव्हतं!!
मम्मामॅडम : (समाधानाने) पण ते तोंडघशी पडले ना? बास!! याहून अधिक आपल्याला काही नको!!
बेटा : (कुत्सितपणाने) ऐकलंस ना मोदीजींचं भाषण? फू:!! मी आयुष्यात इतकं बंडल भाषण कधीही करणार नाही! एकोणसाठ वेळा आपल्या पक्षाचं नाव घेत त्यांनी दूषणं दिली!!
मम्मामॅडम : (हातातली चिठ्ठी तपासत) दीडशे वेळा...महाराष्ट्रातल्या नाना पटोलेजींनी मोजून आकडा पाठवलाय!
बेटा : (विजयीवीराच्या आविर्भावात) अब उनकी उलटी गिनती शुरु हो गई है, मम्मा! पण मला एक कळत नाही, विधेयक पडणार, हे माहीत असूनही मोदीजी आणि शहाजींनी ते पुढे का रेटलं असेल?
मम्मामॅडम : (नाक मुरडत) अति आत्मविश्वास, दुसरं काय? अति तिथं माती!! बारा वर्ष आपलंच घोडं दामटण्याची वाईट खोड लागली होती, आता आली की नाही अंगलट?
बेटा : (संशयानं) अंहं!! ते इतकं सोपं नाही, दयाऽऽ कुछ तो गडबड है...
मम्मामॅडम : (झटकून टाकत) ते मरू दे! त्यांचं थोबाड फुटलं, यासारखा आनंद नाही! त्याहीपेक्षा तुझा प्रभाव पडला, याचा आनंद अधिक आहे...
बेटा : (विषय बदलून) माझं भाषण ऐकलंस? लोडेड होतं माझं स्पीच, असं सगळे सांगत होते...पक्षाच्या मुख्यालयात तर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, मला म्हणाले, ‘‘तुस्सी ग्रेट हो, तोहफा कुबुल
करो!’’
मम्मामॅडम : (कौतुकाचा वर्षाव करत) जस्ट सुपर्ब! तू छान बोललास! दिदीनंही छान किल्ला लढवला! मला तुम्हा दोघांचाही अभिमान आहे बरं का!!
बेटा : (कपाळाला आठ्या घालून) पण माझं जास्ती चांगलं झालं भाषण! मी इतिहास घडवला मम्मा, आय क्रिएटेड हिस्टरी!
मम्मामॅडम : (अलाबला घेत अतीव कौतुकानं) हो रे बाबा, हो!! पण तुझ्या दिदीनं अमित शहाजींना जाहीररित्या हसायला लावलं, हे विसरू नकोस! त्या चेहऱ्यावर आजवर कुणीही हसू पाहिलेलं नाही! जो हस गया, वो फस गया!!
बेटा : (आक्रमक पवित्र्यात) करेक्ट! तिथेच सगळा गेम फिरला! ते हसले तेव्हाच मला कळलं, मनातून ते रडतायत! त्यांना मी तिथल्या तिथे आव्हान दिलं की हसता काय, बाहेर भेटा!! माझ्याशी जाहीर वादविवाद करा, तुम्हाला हरवीन!!
मम्मामॅडम : (खुर्चीत स्थानापन्न होत) आता निवडणुकीच्या कामात लक्ष घातलं पाहिजे!
बेटा : (निरागस आत्मविश्वासाने) मम्मा, आता मागे वळून पाहायचं नाही, यापुढची सगळी इलेक्शन आपण जिंकणार! ये तो अभी झाकी है, असली पिक्चर बाकी है!!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) ते खरं रे! पण...
बेटा : (निर्धारानं) मी ठरवलंय! कुठल्याही परिस्थितीत अमित शहाजींना खोखो हसायला लावतो की नाही बघ!