अग्रलेख : विसंगतीच्या भोवऱ्यात 'ती'
esakal April 20, 2026 09:45 AM

चांगल्या विचारांच्या अभावामुळे चढणारा गंज म्हणजे वाईट गोष्ट होय! - टी. हूड

एका बाजूला महिलांच्या सक्षमीकरणाचे, त्यांना निर्णयप्रक्रियेत समान स्थानदेण्याचे ढोल बडवले जात आहेत. आम्हीच कसे महिला सक्षमीकरणाचे कैवारी आहोत, हे दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे. महिलांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सहभागाला चालना देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. हे एकीकडे; आणि दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटना हे वास्तव चित्र चिंताजनक आहे. महाराष्ट्रात भोंदूबाबांच्या नावाखाली महिलांची फसवणूक, मानसिक व शारीरिक शोषणाच्या घटना दररोज समोर येत आहेत. अंधश्रद्धा व परिस्थितीचा फायदा घेत महिलांना जाळ्यात ओढले जाते आणि अत्याचार केले जातात. यासोबतच ‘लव्ह जिहाद’सारख्या वादग्रस्त मुद्द्यांभोवतीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. हे अंतर्विरोधाचे भोवरे अनेक प्रश्न निर्माण करीत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा आणि प्रत्यक्षात त्यांच्या सुरक्षिततेची हमी यामध्ये दरी का आहे? आणि ती कोण भरून काढणार? कायद्याची कडक अंमलबजावणी, जनजागृती, अंधश्रद्धेविरुद्ध लढा आणि महिलांना न्याय मिळवून देणारी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे, याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आता आली आहे.

महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य ‘नरबळी व जादूटोणाविरोधात’ विशेष कायदा करणारे पहिले राज्य. पण कायदा करूनही प्रकार थांबले किंवा कमी झालेत, असे नाही. महिला अत्याचार व अंधश्रद्धेची अनेक प्रकरणे काळाच्या ओघात विस्मरणात गेली. अशोक खरात या भोंदूमुळे महाराष्ट्र पुन्हा ढवळला गेला. कायद्यानुसार या प्रकरणाचा शेवट काय होतो, हे पाहण्यासाठी किती काळ लागेल हे सांगता येत नाही. पण खरात प्रकरणाकडे गांभीर्याने बघण्याची गरज कोणाला वाटलेली नाही, हे आत्तापर्यंत आलेली राजकीय विधाने आणि समाजमाध्यमांवरील मिम्स, व्हिडिओ, पोस्ट बघून स्पष्ट होते. तो टिंगलीचाच विषय अधिक झाला. आपण ‘समाजभान’ हरवत चालल्याची ही लक्षणे आहेत. नाशिकमधील ‘टीसीएस’ कंपनीतील लैंगिक छळाचे प्रकार पुढे आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा हादरला. अमरावती येथे एका १९ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणात १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. हे प्ररकरण ताजे असतानाच लासलगाव परिसरात लग्नाचे आमिष, शारीरिक अत्याचार आणि त्यानंतर धर्मांतराचा प्रयत्न असे प्रकार झाल्याचा संशय आहे. पीडित तरुणीला संशयिताने ‘लव्ह बाइट’च्या नावाखाली शरीरावर जखमा करण्याबरोबरच तिचे अश्लील फोटोही काढले. स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असे भासविणाऱ्या एका भोंदू महाराजाला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रत्येक प्रकरण ‘राजकीय’ वा सांप्रदायिक चष्म्यातून पाहायचे, मोर्चे काढायचे, आरोपप्रत्यारोप करायचे आणि प्रकरणांच्या मुळाशी जाण्याबाबत मात्र चालढकल करायची, असे अनेकदा आढळून आले आहे. ‘‘राज्यात धर्मांतराची प्रकरणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत’’, असे नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाच्या आढावा बैठकीत सांगितले आहे. बेकायदा रीतीने धर्मांतरे घडविणे हे निषेधार्हच आहे, याविषयी शंका नाही; परंतु संबंधित घटनांचा याच चौकटीत विचार करणे कितपत सयुक्तिक आहे? ‘स्त्रियांविरुद्ध होणारे गुन्हे’ या व्यापक दृष्टिकोनांतूनही या प्रश्नाकडे पाहायला हवे. मुळात असे प्रकार करण्याचे गुन्हेगारांचे धाडस का होते आणि तरुणी, महिला अलगदपणे जाळ्यात का सापडतात, या सगळ्या प्रश्नांचा सामाजिक अंगानेही विचार करण्याची गरज आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न केवळ धोरणांपुरता मर्यादित नसून तो समाजाच्या मानसिकतेशी घट्ट जोडलेला आहे. राजकीय सत्तेत स्त्रियांना समान वाटा मिळण्याची प्रक्रियाही किती नागमोडी आहे, हे याचा प्रत्यय नुकताच आला. पण तेवढे केले तरी ते पुरेसे नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. राजकीयदृष्ट्या महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळाले म्हणजे समाजात तिचे स्थान आपोआप उंचावेल, तिला कुटुंबात प्रतिष्ठा मिळेल, असे नाही. त्यासाठी सामाजिक पातळीवरही प्रयत्न करावे लागतील. प्रत्यक्ष जीवनात स्त्रियांना अजूनही अनेक पूर्वग्रह, रूढी आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागते. तिचे वस्तूकरण केले जात आहे. महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अंधश्रद्धा, हतबलता यातून आलेली आहे, असे मानले तरी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित लोकच अशांच्या पायांवर लोटांगण घालत असतील तर दोष कुणाला द्यायचा? महिलांवर होणारे अत्याचार केवळ कायद्याचा विषय नसून तो समाजातील विषमतेचाही प्रश्न आहे. यातून मग महिलांना सुरक्षिततेच्या नावाखाली नियंत्रणाखाली ठेवण्याची प्रवृत्ती बळावते. शिक्षण, जनजागृती आणि विचारांमध्ये बदल यांद्वारेच महिलांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळू शकते.

एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणाचे नारे, तर दुसरीकडे त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना. अद्यापही सामाजिक बदलांची प्रक्रिया अपुरी राहिली आहे, याची विषण्ण जाणीव करून देणारे हे समाजचित्र आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.