Pune News: दोषी ठरूनही लिपिकाची खुर्ची कायम; 'सार्वजनिक बांधकाम'ची कागदोपत्री कारवाई, प्रत्यक्षात पायघड्या, काय म्हटले आहे अहवालात?
esakal April 20, 2026 11:45 AM

-प्रसाद कानडे

पुणे : गंभीर आरोप असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा मंडळातील प्रथम लिपिक हेमंत टंकसाळे यांची विभागीय चौकशी झाली. त्यात ते दोषी आढळले. त्यांच्यावर १८ नोव्हेंबर २०२५ला कारवाईचा आदेशही दिला. मात्र, त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. कारवाई न होण्यामागे साताऱ्यातील येथील बड्या नेत्याचा दबाव असल्याची चर्चा आहे.

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

हेमंत टंकसाळे हे सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात ‘प्रथम लिपिक’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर शासकीय सेवेत असताना कर्तव्यात कसूर करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवापुस्तकात फेरफार करणे आणि कामासाठी लाचेची मागणी करणे असे गंभीर आरोप झाले. त्यानुसार त्यांची विभागीय चौकशी झाली. यात गंभीर बाबी निष्पन्न झाल्या. त्यानुसार त्यांच्यावर दोन वर्षांसाठी कनिष्ठ वेतनश्रेणीवर पदावनतचे आदेश दिले. तसेच याच काळात त्यांची वेतनवाढ रोखण्याचाही आदेश दिला. मात्र अद्यापही हेमंत टंकसाळे हे ‘प्रथम लिपिक’ म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

काय म्हटले आहे अहवालात

हेमंत टंकसाळे यांनी ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९’ मधील नियम ३चे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले. मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना सेवेतून बडतर्फ न करता, दोन वर्षांसाठी खालच्या पदावर पाठवण्यात येणार तसेच या काळात त्यांची वेतनवाढ होणार नाही आणि दोन वर्षांनंतर पुन्हा नियुक्ती करताना त्यांच्या मूळ वेतनश्रेणीवर होईल, असे अहवालात नमूद आहे.

चौकशीत या बाबी सिद्ध

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवापुस्तकातील महत्त्वाची पाने फाडून ती गहाळ केल्याचे सिद्ध झाले.

एका प्रकरणात सेवापुस्तक शोधून देण्यासाठी त्यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

इतर कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करून महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आणि कपाटाच्या चाव्या स्वतःच्या ताब्यात बेकायदेशीरपणे ठेवल्याचे चौकशी समितीला आढळून आले.

प्राप्त कागदपत्रांनुसार टंकसाळे दोषी असल्याचे स्पष्ट होते. अद्याप का कारवाई झाली नाही याची देखील चौकशी होईल. दोषी असल्याने निश्चितच टंकसाळे यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल.

- प्रज्ञा वाळके, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे

Pune Education News: उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय; ४ मेपासून हाेणार सुरुवात!

माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मी नियमांनुसार काम केले. माझ्या विरोधात जाणीवपूर्वक तक्रार करण्यात आली असून ती पूर्णपणे खोटी आहे. मी माझा लढा देत राहीन.

- हेमंत टंकसाळे, प्रथम लिपिक, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सातारा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.