रेल्वेवर आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एक मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डबा रुळावरुन घसरला. यामुळे सीएसएमटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक प्रवासी ट्रॅकवर उतरुन चालत जाताना दिसत आहेत.
नेमकं काय घडलं?आज सकाळी ८ च्या दरम्यान ही घटना घडली. कळवा कारशेडमधून एक रिकामी लोकल गाडी कल्याणच्या दिशेने जात होती. त्याचवेळी डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान या गाडीचा एक डबा अचानक रुळावरून खाली उतरला. सुदैवाने, ही लोकल रिकामी होती. यात कोणताही प्रवाशी प्रवास करत नव्हता. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावर म्हणजेच मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवकर मोठा परिणाम झाला आहे.
यामुळे गाड्यांचा खोळंबा पाहायला मिळत आहे. सध्या अप मार्गावरील ३ गाड्या जागीच थांबल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा विलंब होत आहे. तसेच सध्या स्थानकांवर गर्दी पाहायला मिळत आहे. कामावर जाण्याची वेळ असल्याने डोंबिवली, कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. अनेक लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असून काही गाड्या रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शक्य तितक्या लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे आश्वासन रेल्वेने दिले आहे.