3 वेळा बिग बॉसच्या घरात, 6 वर्षांनंतर पुन्हा मोडलं स्वप्न; ट्रॉफी न घेताच परतला घरी
Tv9 Marathi April 20, 2026 12:45 PM

छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. मराठी भाषेतील सहावा सिझन नुकताच संपुष्टात आला आणि रत्नागिरीच्या तन्वी कोलतेनं ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तन्वीने राकेश बापट आणि विशाल कोटियन यांसारख्या दमदार स्पर्धकांना मात दिली. ‘बिग बॉस मराठी 6’चा ग्रँड फिनाले रविवारी 19 एप्रिल 2026 रोजी पार पडला. यंदाच्या सिझनमध्ये तन्वीसोबतच राकेश आणि विशालसुद्धा तगडे स्पर्धक मानले जात होते. हे दोघं याआधी एकमेकांच्या विरोधात उभे होते. राकेश आणि विशाल यांनी याआधीही बिग बॉस या शोमध्ये भाग घेतला होता. हे दोघं एकत्रच सलमान खानच्या हिंदी शोमध्ये होते. परंतु त्या सिझनमध्येही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने बाजी मारली होती. बिग बॉस हिंदीमध्ये दोघांचाही प्रवास खूप लवकर संपुष्टात आला होता.

राकेश बापट ठरला कमनशिबी

विशाल कोटियन जरी बिग बॉसमध्ये दोनच वेळा सहभाग झाला असला तरी राकेश बापटलाही संधी तीन वेळा मिळाली. दोन संधी तर त्याला एकाच वर्षात मिळाले. राकेशने 2021 मध्ये बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमध्ये आणि बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये भाग घेतला होता. ओटीटीच्या सिझनमध्ये राकेशचा प्रवास अत्यंत दमदार होता. करण जोहरने सूत्रसंचालन केलेल्या या सिझनमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत त्याची चांगली जोडी जमली होती. या दोघांचं नातं इतकं चर्चेत होतं की बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही ते एकमेकांना डेट करू लागले होते. या सिझनमध्ये शमिता सेकंड रनर-अप ठरली, तर राकेशला थर्ड रनर-अपवर समाधान मानावं लागलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ओटीटीनंतर राकेशने लगेच सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये सहभागी झाला. ओटीटीवर दोघांची केमिस्ट्री तुफान गाजल्यामुळे निर्मात्यांनी शोमध्येही तीच जोडी पुढे आणली. परंतु यावेळी दोघांची जादू विशेष चालली नाही. शो सुरू झाल्यानंतर महिनाभरातच राकेशने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये राकेशचा खेळ चांगलाच रंगला होता. तो प्रत्येकाशी अत्यंत विचारपूर्वक वागत होता. त्याच्या या जेंटलमन इमेजला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली होती. टास्कमध्येही राकेश चांगला परफॉर्म करत होता. विशाल कोटियन आणि त्याच्यात जबरदस्त टक्कर पहायला मिळायची. परंतु यंदाच्या सिझनमध्ये तन्वी कोलतेचा खेळ सर्वांत प्रभावशाली ठरला. तन्वीमुळे राकेशला तिसऱ्यांदा विजेतेपदापासून दूर राहावं लागलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.