Satara Accident News : सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 10 दिवसांपूर्वीच विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर येरफळे गावाजवळ घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजू झोरे (वय 25) आणि त्यांची पत्नी राणी झोरे (वय 23) अशी मृतांची नावे आहेत. मृत पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
नेमका अपघात कसा झाला? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, दोघे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी येरफळे गावच्या हद्दीत एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पुढचे चाक निखळून लांब पडले तर पिकअप गाडीच्या समोरील काचेचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 10 दिवसापूर्वीच राजू झोरे आणि राणी झोरे यांचा विवाह झाला होता. पण अचानक काळाने त्यांच्यावर घाला घतला आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच गावात शोककळा पसरली आहे. अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नालासोपारा पूर्वेतील वालई पाडा परिसरात आज एक धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास एक कार थेट विहीरत कोसळल्याची घटना घडली आहे. संतोषी माता मंदिराजवळून जाणारी सेंट्रो कार अचानक अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली. या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आचोले अग्निशमन केंद्राची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे.
प्रमुख अग्निशमन अधिकारी किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. शिडी (लॅडर) आणि सुरक्षा बेल्टच्या सहाय्याने अग्निशामक जवानांनी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरुन दोन्ही जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून, जखमींना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांनी अग्निशामक दलाच्या तत्पर कामगिरीचे कौतुक केले आहे.