सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
सचिन गाड April 21, 2026 02:13 AM

मुंबई : तिने आजवर अनेक पार्ट्यांना ड्रग्ज पुरवलं होतं.. तरी देखील ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. कारण पोलिसांना चकवा देण्यासाठी तिनं शक्कलच तशी शोधली होती. मात्र नेस्को ड्रग्ज प्रकरणाचा (Nesco Drugs Party Case) तपास करणाऱ्या पोलिसांना तिच्याबाबत एक मोठी टिप मिळाली. पोलिसांना ही संधी दवडायची नव्हती. त्यांनी देखील पाळत ठेवली आणि योग्यवेळी छापा मारून तिला बेड्या ठोकल्या. तिच्या घरातून थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 6 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं. कोण आहे ही ड्रग्ज क्विन आणि तिचा वादग्रस्त भूतकाळ काय आहे?

रंगीबेरंगी एक्स्टसी (Ecstasy Drugs) गोळ्यांच्या माध्यमातून तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. टिटवाळा परिसरात राहणारी अश्विनी पॉल (Ashwini Paul) ही या रॅकेटमागची प्रमुख ‘ड्रग्ज क्वीन’ असल्याचा संशय असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिच्या घरावर छापा टाकत तब्बल 6 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

Drug Network Investigation : तपासातून उलगडत गेले धागेदोरे

नेस्को प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने साकीनाका परिसरातून इरफान अन्सारी (Irfan Ansari) याला अटक केली होती. त्याच्याकडून 200 एक्स्टसी गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुफियान (Sufiyan) नावाचा आणखी एक आरोपी पकडण्यात आला. या दोघांच्या चौकशीतूनच अश्विनी पॉलचे नाव समोर आले. सुफियान हा अश्विनी आणि इरफान यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

Drug Queen Profile : बारबालापासून ड्रग्ज क्वीनपर्यंतचा प्रवास

अश्विनी पॉल ही मूळची पुण्याची रहिवासी असून तिने सुरुवातीला मुंबईत बारबाला म्हणून काम केले होते. डान्स बारमध्येच तिची ओळख ड्रग्ज तस्करांशी झाली आणि हळूहळू ती या रॅकेटमध्ये सक्रिय झाली. तपास चुकवण्यासाठी ती दर दोन ते तीन महिन्यांनी आपले ठिकाण बदलत होती. टिटवाळ्यापूर्वी तिचे वास्तव्य नवी मुंबई आणि कल्याण परिसरात होते.

Police Raid Operation : तीन दिवस पाळत, नंतर छापा

पोलिसांना अश्विनी पॉल टिटवाळ्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत गुप्तपणे तिच्यावर नजर ठेवली. जवळपास तीन दिवस तिच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली. सर्व माहितीची खातरजमा केल्यानंतर शनिवारी रात्री तिच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला.

Seized Evidence : मोबाईल, सिमकार्ड आणि VOIP नेटवर्क

अश्विनीच्या घरातून 4 ते 5 मोबाईल फोन आणि 7 ते 8 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. ती VOIP कॉलद्वारे ड्रग्ज नेटवर्कशी संपर्कात राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये पार्टी ड्रग्जचा पुरवठा करण्याचे काम ती करत होती. विशेष म्हणजे, अश्विनीने दोन विवाह केल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे.

Nesco Link Angle : ‘मर्सिडीज’ कोडवर्डचा गूढ

नेस्को प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानी (Vinit Gerelani) याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एक्स्टसी गोळ्यांवर ‘मर्सिडीज’ असे कोडवर्ड कोरलेले होते. तशाच प्रकारचे कोडवर्ड अश्विनी पॉलकडून जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांवरही आढळले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

International Drug Racket : परदेशी कनेक्शनचा संशय

या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचले आहेत का, याचाही तपास सुरू आहे. अश्विनी पॉल ही या नेटवर्कमधील केवळ एक कडी असून यामागे मोठा मास्टरमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या तपासातून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून, अनेक ‘ड्रग्ज क्वीन’ आणि तस्करांचा पर्दाफाश होऊ शकतो.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.