Solapur Crime News: लग्नास नकार दिल्याचा जुना राग मनात धरून एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला एक्स बॉयफ्रेंडने संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये (Solapur Crime News) घडली आहे. सोनी गणेश रामपुरे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापू सुरेश आरगोड याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मयत सोनी रामपुरे ही 9 महिन्यांची गर्भवती होती आणि बाळंतपणासाठी आपल्या माहेरी (आई लक्ष्मी म्हेत्रे यांच्याकडे) आली होती. 19 एप्रिल रोजी शेजारी राहणारा आरोपी बापू आरगोड हा मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून नाचत गोंधळ घालत होता. सोनीच्या प्रकृतीला आवाजाचा त्रास होऊ नये आणि नाचताना तिला धक्का लागू नये, या उद्देशाने सोनीच्या आईने बापूला साऊंड बंद करण्यास सांगितले.
साऊंड बंद करायला सांगितल्याचा राग मनात धरून बापूने लक्ष्मी म्हेत्रे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली. हे भांडण सोडवण्यासाठी सोनी मध्यस्थी करायला आली असता, बापूने तिला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. ती गर्भवती असल्याचे माहित असूनही त्याने तिचा गळा दाबून तिला भिंतीवर जोरात आदळले. या जीवघेण्या हल्ल्यात सोनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी आणि बापू आरगोड यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, बापू हा व्यसनी होता आणि कोणताही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे सोनीच्या कुटुंबीयांनी त्याला लग्नासाठी नकार दिला होता आणि 2025 मध्ये सोनीचा विवाह गणेश रामपुरे यांच्याशी लावून दिला होता. याच गोष्टीचा राग बापूच्या मनात होता. साऊंड सिस्टीमचा वाद हे केवळ निमित्त ठरले, मात्र जुन्या रागातूनच त्याने हे कृत्य केल्याचा आरोप सोनीच्या आईने फिर्यादीत केला आहे. या प्रकरणात आरोपी बापू आरगोड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या