Maharashtra Rain Update: मुंबई-पुणे अलर्ट! पुढील काही तासांत वादळी पाऊस, विजांचा कडकडाट; उष्णतेच्या तडाख्यात अचानक बदलाचा इशारा
esakal April 21, 2026 05:45 PM

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) २० एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा गडगडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पुढील तीन तासांत पावसाची शक्यता असल्याने केंद्रीय मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना टेस्ट मेसेज पाठवण्यात आले आहेत.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

आज २१ एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात मात्र उष्णतेचा तीव्र तडाखा कायम राहिल्याने वर्धा आणि अकोला येथे उच्चांकी तापमान नोंदवले जात आहे. राज्यभरात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल हवामान असल्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता वाढली आहे. विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट अद्याप कायम आहे.

सोमवारी (२० एप्रिल) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला आणि वर्धा येथे देशातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तसेच वायव्य भारतात समुद्र सपाटीपासून १२.६ किलोमीटर उंचीवर ताशी ११० नॉट्स वेगाने जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत.

Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

रविवारी (१९ एप्रिल) दुपारी उकाडा वाढल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अचानक पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. सोमवारी सकाळपर्यंत सांगली, धाराशिव, नांदेड, हिंगोली, वाशीम, बुलडाणा, अकोला आदी जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून वाढलेल्या उन्हाच्या झळांनी जनजीवन काहिल झाले असताना, या अनपेक्षित पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला.

उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट कुठं?

तापमानाच्या बाबतीत सोमवारी वर्धा आणि अकोल्यानंतर नागपूर आणि अमरावती येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. भंडारा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ येथे ४३ अंशांपेक्षा जास्त, तर धुळे, जेऊर, सोलापूर, चंद्रपूर आणि वाशीम येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे २०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आला आहे. तर वादळी पावसाची शक्यता असलेल्या जिल्ह्यांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली यांचा समावेश आहे. अकोला ४५, वर्धा ४५, नागपूर ४४.४ आणि अमरावती ४४.२ अंश सेल्सिअस अशी उच्च तापमानाची नोंद झाली आहे.

Rain Update: उकाड्यानंतर गारवा! सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार, गारांचाही मारा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.