लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
जयदीप मेढे April 21, 2026 06:13 PM

हैदराबाद : एखाद्या चित्रपटालाही शोभावी अशी एक थरारक आणि धक्कादायक गुन्हेगारी घटना हैदराबादमध्ये (Hyderabad Crime News) उघडकीस आली आहे. युकेमध्ये राहणाऱ्या एका फार्मासिस्टने आपल्या सासरच्या संपूर्ण कुटुंबाला जेवणातून विष देऊन संपवण्याचा कट रचला. मात्र, डॉक्टरने पीडित महिलेच्या नखांवरील पांढरी रेषा (Mees’ lines) ओळखली आणि एक मोठा कट उधळला गेला.(Hyderabad Crime News)

जुलै २०२३ मध्ये ३० वर्षीय शशिरेखा हिला गंभीर अवस्थेत गुंटूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे हात-पाय सुजलेले होते आणि तिला सतत उलट्या आणि जुलाब होत होत्या. न्यूरोलॉजिस्ट डॉ. तारकानाथ यांनी शशिरेखाच्या नखांवर असलेल्या पांढऱ्या आडव्या रेषा पाहिल्या. वैद्यकीय भाषेत याला 'मीस लाईन्स' (Mees’ lines) म्हणतात, जे आर्सेनिक विषबाधेचे मुख्य लक्षण आहे. चाचणीअंती तिच्या शरीरात सामान्य मर्यादेपेक्षा १० पट जास्त विष आढळले आणि इथूनच तपासाची चक्रे फिरली.(Hyderabad Crime News)

Hyderabad Crime News : अजितचा 'विषारी' सूड आणि कौटुंबिक कलह

तपासातून समोर आले की, हा कट त्यांच्या कुटूंबातील मुलगी शिरिषाचा विभक्त पती अजित कुमार याने रचला होता. अजित युकेमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे. शिरिषा आणि अजित यांचे २०१८ मध्ये लग्न झाले होते, परंतु अजित तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. अगदी चाकूचा धाक दाखवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. शिरिषाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने चिडलेल्या अजितने तिच्या संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचे ठरवले.

Hyderabad Crime News :  मीठ आणि तिखटातून दिला मृत्यूचा डोस

फार्मासिस्ट असल्याने अजितला विषाची माहिती होती. त्याने विज्ञानाची शिक्षिका असलेल्या आपल्या बहिणीमार्फत शाळेतून आर्सेनिक मिळवले. अजितने हे विष मीठ आणि तिखटात मिसळून एका डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून सासरच्या घरी पाठवले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून ही पाकिटे घरपोच करण्यात आली. जून २०२३ मध्ये शिरिषाच्या भावाच्या लग्नादिवशी घरातील सर्व सदस्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास झाला होता. मात्र, अन्नात विष असेल अशी पुसटशी शंकाही कोणाला आली नाही.

Hyderabad Crime News : एक बळी आणि अनेक प्रयत्न

या विषबाधेमुळे शिरिषाची आई उमा माहेश्वरी यांचा ५ जुलै २०२३ रोजी मृत्यू झाला. कुटुंबाला हा नैसर्गिक मृत्यू वाटला, परंतु आता तो खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी अजितने शिरिषाच्या वडिलांना अपघातात मारण्यासाठी ४ लाख रुपयांची सुपारीही दिली होती, पण तो प्रयत्न फसला होता. शेवटी त्याने अन्नातून विष देण्याचा मार्ग निवडला.

तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणात अजितची बहीण सुरेंद्र मुप्परापू हिच्यासह नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी अजित युकेमध्ये फरार होता, मात्र सायबराबाद पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने 'ब्लू आणि रेड कॉर्नर' नोटीस जारी केली. अखेर १७ जानेवारी २०२५ रोजी युके पोलिसांनी त्याला बर्कशायर येथून अटक केली.

Hyderabad Crime News : शिरीषा-अजितमध्ये काय घडलेलं?

या घटनेची सुरुवात २०१८ मध्ये झाली. पहिल्या लग्नातून घटस्फोट घेतलेल्या अजित आणि शिरीषा यांची मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली. शिरीषाची मुलगी त्यावेळी ७ वर्षांची होती; तर अजितलाही एक मुलगा आहे. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने, हैदराबाद येथील एका मंदिरात त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसातच अजितने शिरीषाचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली होती. हैदराबादमध्ये दोन महिने घालवल्यानंतर, ते यूकेला स्थलांतरित झाले; तिथे अजित सल्लागार म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे औषधशास्त्राची पदवी होती, पण तो इतरही अनेक प्रकारची काम करायचा अशी माहिती शिरीषाने दिली. शिरीषानेही तिथे जनरल प्रॅक्टिशनर ट्रेनी म्हणून नोकरी केली. यूकेला जाताच तो माझा शारीरिक छळ करायला लागला. छोट्या गोष्टींवरुन चिडायचा आणि मग माफी मागायचा. पण छळ असह्य झाला आणि मी घराबाहेर पडले, असं शिरीषा म्हणाली.

Hyderabad Crime News : तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी

अजितने शिरीषाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. एकदा रस्त्यावर त्याने तिच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि तुझा कायमचा काटा काढीन असं म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०२२ मध्ये  घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. अवघ्या दोन महिन्यांतच, त्याने माझ्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्याचा कट रचला" अशी माहिती शिरीषाने दिली. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.