मुक्ताई अकॅडमीचे खेळाडू चमकले
राष्ट्रीय बुद्धिबळ ः बाळकृष्ण, पुष्कर, आकाशचे लक्षवेधी यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः मडगाव येथील युनिटी क्लबने आयोजित केलेल्या चौथ्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर याने बाविसावा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे आयोजन नागोवा, मडगाव येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉलमध्ये करण्यात आले. विविध राज्यांतील ३२१ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येथील मुक्ताई अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय मानांकित बाळकृष्ण पेडणेकर, पुष्कर केळूसकर, विघ्नेश अंबापूरकर तसेच प्रज्वल नार्वेकर, आकाश वाटवे यांनी सहभाग घेतला. यावेळी रॅपिड रेटिंग स्पर्धेसोबत ब्लिट्ज नॉनरेटिंग स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. बाळकृष्णने रॅपिड रेटिंग स्पर्धेत नऊ फेऱ्यांमध्ये सहा जिंकून आणि एक बरोबरीत सोडवून साडेसहा गुणांसह बाविसावा क्रमांक मिळविला. ब्लिट्ज नॉनरेटिंग स्पर्धेत नऊ फेऱ्यांमध्ये सहा जिंकून आणि एक बरोबरीत सोडवून साडेसहा गुणांसह एकोणिसावा क्रमांक मिळवला. त्याला रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. रॅपिडमध्ये पुष्कर केळूसकर याने सहा फेऱ्या जिंकून सहा गुणांसह आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये तब्बल ५४ गुणांची वाढ केली. नऊ वर्षीय विघ्नेश अंबापूरकर याने पाच फेऱ्या जिंकून पाच गुण केले. दहा वर्षीय प्रज्वल नार्वेकरने दोन आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंना हरवून चार गुण केले.
मुक्ताई अकॅडमीचा जिल्ह्यातील लहान खेळाडू सात वर्षीय आकाश वाटवे याने पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. आकाशने दोन खेळाडूंवर विजय मिळवून दोन गुण केले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. सर्व स्तरातून यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.