'राजकारणात काम करणाऱ्या महिला राजकारण्यांसोबत बेडवर…', खासदाराचे खळबळजनक विधान
Tv9 Marathi April 21, 2026 09:45 PM

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांना बिहार राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. मंगळवार, 21 एप्रिल 2026 रोजी ही नोटीस बजावण्यात आली आहे. अलीकडेच पप्पू यादव यांनी राजकारणात काम करणाऱ्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पप्पू यादव यांनी महिलांविषयी नेमकं काय वक्तव्य केले होते जाणून घ्या…

उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा वेळ

पप्पू यादव यांना उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बिहार राज्य महिला आयोगाने स्वतःहून दखल (Sua Sponte) घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांच्याकडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. आता पप्पू यादव आपल्या स्पष्टीकरणात काय म्हणतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नोटीसमध्ये काय लिहिले आहे?

पप्पू यादव यांना बजावलेल्या नोटीसमध्ये आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, “सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांबद्दल अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले आहे. यामध्ये तुम्ही असे म्हटले आहे की, राजकारणात काम करणाऱ्या महिला कोणत्या ना कोणत्या राजकारण्यासोबत ‘बेड शेअर’ करूनच पुढे येतात. तुमचे हे वक्तव्य महिलांचा आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणारे आहे.”

पप्पू यादव यांनी असे म्हटले होते की, ९० टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत. दररोज सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत असतात. शाळा असो किंवा कार्यालय, प्रत्येक ठिकाणी महिलांचे शोषण होते.

नोटीसमध्ये पुढे लिहिले आहे की, “यावर बिहार राज्य महिला आयोग स्वतःहून दखल घेत असून, तुम्ही असे घृणास्पद वक्तव्य का केले? याचे उत्तर मागत आहे. तसेच, तुमचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे शिफारस का केली जाऊ नये? तरी, या घृणास्पद वक्तव्याबाबत तुमचे स्पष्टीकरण पत्र मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत सादर करावे. याला अत्यंत तातडीचे मानले जावे.”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.