Baramati Bypoll News : स्व. अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा पवारांना पाठिंबा; मतदान हक्कापासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त करत शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन
esakal April 21, 2026 11:45 PM

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान करता येणार नसल्याबद्दल खेद व्यक्त करत, मतदारांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

समाजमाध्यमावर केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणातात “मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझा मतदानाचा हक्क अखंडपणे बजावत आलो आहे. मात्र यंदा महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत मला मतदान करता येणार नाही, याची खंत वाटते,”

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी प्रवासास मनाई केल्याने मतदानासाठी बारामतीत येणे शक्य नाही. अत्यंत नाईलाजास्तव मला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. बारामतीतील नागरिक, मतदार व कार्यकर्ते माझी परिस्थिती समजून घेतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगत, “स्व. अजित पवार यांना ही आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. बारामतीकरांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून त्यांना विजयी करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

निवडणूक आयोगाच्या पर्यायी मतदान पद्धतींचाही विचार केला, मात्र ते पर्याय उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. “जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा लागला असून बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करावे” असे त्यांनी शेवटी नमूद केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.