‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तन्वी कोलतेनं ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला आणि आपल्या दमदार खेळीने तिने हा सिझन जिंकला. राकेश बापट, विशाल कोटियन यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मात देत तन्वीने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर तन्वीचा चाहतावर्ग आणखीनच वाढला आहे.
तन्वीचं शालेय शिक्षण रत्नागिरीत झालं, तर पुढील शिक्षणासाठी ती पुण्याला गेली. तिथे तिने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून बी.टेकची पदवी प्राप्त केली. इंजीनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेऊनही तन्वीची आवड मात्र अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये होती.
टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तिने विविध सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. ‘मिस रत्नागिरी 2018’, ‘मिस गोवा 2020’ हे किताब तिने पटकावले आहेत. त्यानंतर ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तन्वीने विविध मराठी म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे.
‘बिग बॉस मराठी 6’ जिंकल्यानंतर तिला बक्षीस म्हणून 15 लाख रुपयांचा धनादेश आणि 10 लाख रुपयांचं डायमंड ज्वेलरीचं वाऊचर मिळालं. यानंतर तन्वीच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तन्वीची एकूण संपत्ती 58 ते 80 लाख रुपयांदरम्यान आहे. मालिका आणि जाहिरातींमधून ती बराच पैसा कमावते.