Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच
esakal April 23, 2026 02:45 AM

पाली : राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप गुरुवारी (ता. 23) तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. रायगड जिल्ह्यातील समन्वय समितीने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, जोपर्यंत शासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. 22) सायंकाळी ५ ते ६:३० या वेळेत संघटना सुकाणू समितीची राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या एकूण १८ मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीतील वातावरण सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत असले तरी, या चर्चेचे अधिकृत इतिवृत्त जोपर्यंत शासनाकडून प्राप्त होत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

शासनासोबतची चर्चा सकारात्मक झाली असली तरी लेखी निर्णयाशिवाय आम्ही कामावर परतणार नाही. रायगड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी उद्याही संपात सहभागी होतील.

सुरेश पालकर, अध्यक्ष, समन्वय समिती रायगड.

उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

सुकाणू समितीचे प्रमुख आणि राज्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, उद्या समन्वय समितीची पुन्हा बैठक होणार असून, त्यामध्ये शासनाच्या प्रस्तावावर चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल. मात्र, तोपर्यंत संप पूर्ण ताकदीने सुरूच राहील.

रायगड जिल्ह्यात संपाचा मोठा प्रभाव

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शासकीय कार्यालये आणि शाळांमधील कामकाज ठप्प झाले असून, उद्या तिसऱ्या दिवशीही हीच स्थिती कायम राहणार असल्याचे संदीप नागे अध्यक्ष, कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि प्रभाकर नाईक निमंत्रक, समन्वय समिती यांनी कळविले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.