दीनायन : दैवी आवाजाचे दीनानाथ...
esakal April 23, 2026 07:45 AM

दीनानाथांना असलेलं तेजस्वी मधुर आवाजाचं वरदान एकतर्फी नव्हतं, तर कलावंताचे माध्यमावर प्रभुत्व आणि माध्यमाचे कलावंतावर प्रभुत्व यासारखे होते. दीनानाथांचंही सुरावर अतोनात प्रेम होतं. सच्चे सूर, मग ते कोणत्याही वातावरणात असोत, कोणत्याही स्वरूपात किंवा वेशात असोत... त्यांना आकर्षून घेत.

डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे

दीनानाथांची गाण्याची आवड व चमत्कार वाटावा असा असाधारण गळा उपजतच, स्वरांची स्थाने जन्मत: पक्की, म्हणण्यात एक स्वाभाविक फेक. निसर्गाने प्रथमपासूनच दिलेली गतिमान सुरेल तान आणि त्यांचे वैशिष्ट्य ठरावे अशी विलक्षण वेगवान सुदर्शन चक्रासारखी, भिंगरीसारखी ‘फिरत’ बहाल केलेली. या गानगुणांमुळेच की काय गाण्यात एक जोष, एक स्फुरण, जे कानावर पडे ते चटकन उचलले जाई. एकपाठी उत्तम गुणग्राही, असाधारण स्मरणशक्ती, प्रखर ग्रहणशक्ती. वृत्तीमध्ये अस्मिता व ईर्षा (मी माझे गाणे गाईन, कुणाची नक्कल करणार नाही.) तशीच उपजत निर्मितिक्षमता आणि मुक्ततेकडे धाव. मंगेशाचे वरदान म्हणावा असा सर्वगामी, तेजस्वी, निरभ्र, नितळ, धारदार, चढा आवाज त्यांना लाभला होता.

दीनानाथांच्या गाण्यात महत्त्वाचा वेगळा गुणविशेष आढळतो, तो म्हणजे अक्षरांच्या नादसामर्थ्याची त्यांना पटलेली ओळख. नादब्रह्माची उपासना करताना त्यांना पटलेली शब्दब्रह्माची महती. दीनानाथांची वाणी अस्खलित, स्वाभाविक, स्पष्ट आणि लांब पल्ल्याची होती. आजच्यासारखी ती ‘माइक’ची दुनिया नव्हती. त्यामुळे दीनानाथांची ही वाणी त्यांचे स्पष्ट, खणखणीत शब्दोच्चार रंगभूमीवर फार उपयुक्त व प्रभावी ठरत. संगीतातले बारा स्वर पाहिले तर ढोबळमानाने हार्मोनिअममध्ये टेंपर्डस्केलप्रमाणे ते म्हणता येतील. परंतु सिद्ध गायक बावीस श्रुतींचा वापर करून गायनाचा दर्जा उंचावतो. दीनानाथांची प्रतिभा या सर्व श्रुती आणि श्रुतींचेही पुढील भाग यांचा वापर करीत मींड (उदा ः लागे तुझा छंद - यातील तुझा छंदवरील श्रुती मींड) किंवा कंपनयुक्त स्वरलडींनी गाणे सजवीत.

डॉ. जठार म्हणतात, दीनानाथांच्या ईश्वरदत्त गळ्यातून गाण्यातील अमुक एक गोष्ट किंवा प्रकार जाऊ शकत नव्हता असे नव्हते. खटके, मुरक्या, मींड, गमक, झमझमे या गोष्टी होत्याच. परंतु त्यांची एक स्वतंत्र तान होती. तऱ्हेतऱ्हेचे चमत्कृतीपूर्ण तानप्रकार ते लीलया घेत. जलद गती असली तरी सुरांचा गोडवा, भरीवपणा, वजन असे. स्थिर भरावाचे सूर असे बुलंद लावत की कानच नव्हे तर सारे थिएटर त्यांनी भरून जाई. गद्य वातावरण संगीतमय होई. दीनानाथांची सपाट आरोही-अवरोही तान विलक्षण वेगाने जाई. त्याचे वैशिष्ट्य असे की, ‘डबल’ सूर घेतल्याप्रमाणे ती भरघोस लागे. एरवी त्यांची हमखास टाळी येणारी तान होती ती ‘भिंगरी’सारखे चार-पाच सूर फिरवत क्रमश: ते आरोह-अवरोहाची तान घेत. ती वायुतत्त्वावर आधारलेली वाटे. वाऱ्याच्या वावटळीने, झोताने निर्माण झालेल्या भोवऱ्याप्रमाणे ती तान श्रोत्यांच्या अंगावर येई. परंतु आवश्यक तिथे तान पूर्णपणे वगळून केवळ भावनेनेही गीत मांडण्याची क्षमता त्यांच्यात होती. उदा. रतिरंग रंगे ध्यान, वितरी प्रखर, प्रबलता बलहता ही पदे केवळ आलापीने गायिली आहेत. दीनानाथांच्या याच गुणांवर लुब्ध असलेले बालगंधर्व त्यांची ‘रतिरंग रंगे ध्यान’ ही रेकॉर्ड झोपण्यापूर्वी रोज अवश्य ऐकत असत.

दीनानाथांचे गाणे अत्यंत सहज असे. आता उपलब्ध असलेल्या ‘सुहास्य तुझे मनास मोही’ या ध्वनिचित्रफितीत ऐकताना, पाहताना दीनानाथांनी अवघड जागा घेतानाही ‘सुधबानी’, ‘सुधमुद्रा’ राखलेली दिसते. ही त्यांची सहजता पाहून भलेभले गानपंडित अचंबित होत. असे हे त्यांचे गाणे वायुतत्त्वावर आधारित आहे, असे डॉ. जठार यांनी म्हटले आहे. येथे वायुतत्त्वावरील याचा अर्थ वरवरचे गळी गाणे नसून, नाभीपासून बल घेऊन संपूर्ण शरीराद्वारे प्रगट झालेला स्वराविष्कार असे. या वायुतत्त्वाचे अधिक विवेचन करताना ज्येष्ठ संगीततज्ज्ञ ‘लयताल विचार’ या ग्रंथाचे कर्ते आणि ‘विश्रब्ध शारदा’ या ग्रंथाचे ग्रंथकार डॉ. शरश्चंद्र गोखले म्हणतात, ‘वायुतत्त्व म्हटल्यावर आपल्या मनात केवळ सोसाट्याचा वादळवारा, चक्रावर्त झंझावात इत्यादी येते. परंतु दीनानाथांच्या गाण्याच्या बाबतीत आपण वायुतत्त्व हा शब्द वापरतो तेव्हा माझ्या मनात वेगळ्याच कल्पना येतात.’

दीनानाथांच्या आवाजाबद्दल त्यांचेच शिष्य डॉ. प्रभाकर जठार वर्णन करतात, ‘दीनानाथांच्या तानप्रक्रियेत म्हणण्यात हमखासपणा व आत्मविश्वास इतका होता की, लागोपाठ कोमल-तीव्र स्वर घेत वेगवेगळ्या जातीच्या तानेच्या तुकड्यांना एका प्रदीर्घ तानेत गुंफत असत. एका सप्तकातील सुरानंतर त्याला जोडूनच दुसऱ्या सप्तकातील दूरचे स्वर उत्स्फूर्तपणे तात्काळ घेत. या गोष्टीत अगदी सहजता असे. भावनेनुसार आवाजाचा झोत ते कमी-जास्त करीत. गाण्यात ‘टायमिंग’ व ‘फोकसिंग’ यांना ते महत्त्व देत. दीनानाथांचा आवाज भरपूर उंच, भरपूर रुंद, विलक्षण लवचिक होता. तरी भरपूर दमसासाने गाण्यात अतूटपणा होता. ‘सुरेल भावपूर्ण स्वर’ हा दीनानाथांच्या आवाजाचा प्राण होता. यामुळे त्यांची आलापी भरदार व भारदस्त होऊन त्यातून रागस्वरूप पूर्णपणे उभे राहात असे. ग्वाल्हेर गायकीच्या अष्टांग वैशिष्ट्यानुसार आलाप, बोलआलाप, तान, बोलतान याप्रमाणेच खटका, मींड, गमक, बेहलावा अशा सर्व अंगांनी युक्त असे त्यांचे गायन असे.

‘खूप वेळ राग गाणे म्हणजे गाणे खूप चांगले झाले.’ असे समीकरण त्यांना पटत नसे. रंगभूमीवरील गानपद्धतीने चटकन रंग भरणे, गाणे न रेंगाळता ठेवणे, पुनरुक्ती टाळणे, एखादे पद ‘यमन’ किंवा ‘बिहाग’ रागात असेल तर त्या सुरांत, त्या वातावरणात ती भावना गायची, ती खुलवायची-फुलवायची. पदातील त्या भावना खुलवताना अन्यही राग, स्वरांचा तिरोभावाने वापर करीत. भावसौंदर्य व स्वरसौंदर्य कमीत कमी वेळात पण जास्तीत जास्त प्रमाणात साधणे अशी त्यांची गानदृष्टी होती. विचारप्रवृत्ती होती.

दीनानाथ ज्याला खासगी गाण्यात ‘माझे खरे गाणे’ असे म्हणत आणि म्हणून दाखवत ते गाणे विलक्षण समाधान देई. तथापि त्याचबरोबर शरीरालाही जाणवेल अशी आर्तता आणि ओढ निर्माण करी. ‘हे माझे सूर देवाने दिले आहेत. त्या १-१ देवताच आहेत.’ या उत्कट भावनेने ते जे हृदयाला हेलावून टाकणारे, अंतःकरणात झोंबणारे, मंत्रमुग्ध करणारे, वेगळे, अतिशय अपरिचित गाणे म्हणत, त्याच्यामुळे ऐकणाऱ्याचे आणि त्यांचे स्वत:चे डोळे पाण्याने भरून येत. त्या दीनानाथांच्या स्वराला, आवाजाला प्रतिभाशाली गाण्याला, श्री मंगेशाचे अद्भुत वरदानच म्हणावे लागेल.

दीनानाथांना असलेलं तेजस्वी मधुर आवाजाचं वरदान हे एकतर्फी नव्हतं, तर कलावंताचे माध्यमावर प्रभुत्व आणि माध्यमाचे कलावंतावर प्रभुत्व यासारखे होते. दीनानाथांचंही सुरावर अतोनात प्रेम होतं. सच्चे सूर, मग ते कोणत्याही वातावरणात असोत, कोणत्याही स्वरूपात किंवा वेशात असोत... त्यांना आकर्षून घेत. एकदा पायधुणी (मुंबई) येथील मित्र डीवायएसपी सावंत आणि बंधू कमलनाथ यांना घेऊन ते फोरास रोडवरील एका व्यावसायिक गायिकेकडे गेले. अचानक ‘पोलिस’ आणि कलाकाराला पाहून ती बावरली... पण आनंदलीही. तिच्या खास ठेवणीतील गझल कव्वालीतील तिच्या दर्दभऱ्या सुरांना दीनानाथांची सारखी दाद मिळत होती. त्यांचे अंत:करण भरून येत होते, डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.

असेच एकदा ते भुलेश्वरहून (मुंबई), शांताराम मांजरेकरांच्याबरोबर परतत होते. वाटेत गुजराथी वस्तीत मयत झाले होते. बऱ्याच बायका घोळका करून जमल्या होत्या आणि ‘हाय रे, म्हारा... मरी गयो’ अशी ओळ सुरात म्हणत रडत होत्या. ‘त्या सगळ्यांत त्या बाईचा आवाज काय छान आहे बघ! ऐकलास?’ दीनानाथ त्या एका सुरेल स्वरातच हरवून गेले होते!

आवाजावर विलक्षण प्रभुत्व हे त्यांच्या दैवदत्त देणगीबरोबरच सुरांच्या ध्यासातून सुरांवरील विलक्षण प्रेमातून आले होते. मुंबईत शांतारामच्या घरी गेले असताना दीनानाथ कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून, एखाददुसऱ्या फुटावरून हलके गाणे म्हणत. प्रतिध्वनीतून ऐकून कसे लागते ते पाहत, विचार करत, काय व्हायला पाहिजे, काय करायला पाहिजे? कंपनीच्या बाहेरगावच्या मुक्कामात बंगल्याच्या विस्तीर्ण परिसरात पांगलेल्या कंपनीच्या लोकांना जेवणाची वेळ कळवण्यासाठी एखाद्या झाडाला मोठी थाळ बांधून ती ठण् ठण् ठण् वाजवली जायची. दीनानाथ असतील तेथून तो आवाज ऐकत विचारत, ‘येते माझ्या सुराला तशी धार? येतो माझा आवाज तितका दूर?’

दीनानाथांनाही चोवीस तास सुरांचीच सोबत असे. मनात सुरांचा, संगीताचा विचार असे. केव्हाही घरातून निघताना तिथे उभ्या असलेल्या तंबोऱ्याचा ‘जोड’ वाजवून तो सूर बरोबर घेऊन जात. अल्लादिया खाँनी यालाच ‘सूरसंगत रागविद्या’ असं म्हटलं असेल का? सात शुद्ध सूर आणि पाच विकृत स्वराबरोबरच बावीस श्रुती आणि त्याहूनही सूक्ष्मकण श्रुतींवर दीनानाथांचे प्रभुत्व होते. एकदा ते शांताराम मांजरेकरांना म्हणाले, ‘‘शांताराम, मी म्हणेन तशी साथ करशील तू? चल बघू?’’ यानंतर दीनानाथ जे गायले ते पेटीतून काढणे उत्तम स्वरज्ञानाच्या आणि तयारीच्या शांतारामांनाही अशक्य झाले. कारण दीनानाथ जाणूनबुजून ‘बेसूर’ गायले. चुकूनही त्यांनी स्वराला स्पर्श केला नाही. सुरिल्या गायकाला बुद्धिपुरस्सरही बेसूर गाणे किती अवघड आहे हे संगीतातील जाणकारांना ज्ञात आहे.

मा. कृष्णराव फुलंब्रीकर म्हणत, ‘‘दीनानाथांच्या गायनात पहाडी आवाजाबरोबर पहाडी रागामधील तऱ्हाही पुष्कळ असत. काय तो त्यांचा सुंदर रुबाबदार गळा! (आवाज) खणखणीत आवाज आणखी आढळून येतात. परंतु गोडव्याच्या दृष्टीने त्यात अभाव दिसेल. दीनानाथरावांच्या आवाजात खणखणीतपणा व गोडवा असल्याने साहजिकच आनंद वाटत असे.

एच. एम. व्ही. अधिकारी आणि गायक जी. एन. जोशी दीनानाथांची आठवण सांगत. ‘‘माझ्या लहानपणी प्रथमच मी जेव्हा दीनानाथांचे ‘परवशता पाश दैवे’ हे गाणे ऐकले तेव्हा मी अक्षरश: बेचैन झालो होतो. दुसऱ्या दिवशी खासगी भेटीत मी त्यांना पाहिले तेव्हा त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाला मोहून मी एखाद्या देवतेकडे पाहात आहे अशा भावनेने मी त्यांच्याकडे पाहू लागलो. दीनानाथरावांची अस्खलित वाणी, गळ्याची असामान्य फिरत, तानांचे वैचित्र्य व गाताना दिसणारी तडफ आणि लकब यांचा माझ्यावरील पगडा कायम आहे. त्यांच्याइतके तडफेचे, कठीण पण दिलखेचक गाणे माझ्या ऐकण्यात नाही. स्वच्छ वाणी, निकोप आवाज, किंचित अनुनासिक म्हणण्याच्या पद्धतीमुळे आलेली एक प्रकारची बालिश मोहकता व विजेलाही लाजविणाऱ्या गतिमान पल्लेदार ताना यांनी मंत्रमुग्ध होऊन हजारो श्रोते त्या स्वरविलासाला तास न् तास डोलत असत.

(समाप्त)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.