Haryanvi Actress Divyanka Sirohi Dies Heart Attack: दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते कसेबसे सावरतच होते, तोच मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं अखेरचा श्वास घेतला आहे. अनेकदा 'सायलेंट किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवघेण्या हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) प्रसिद्ध अभिनेत्रीचा जीव घेतलाय. अभिनेत्री दिव्यांका सिरोही (Divyanka Sirohi) हिचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन झालंय. अभिनेत्रीच्या अशा अकाली एग्झिटनं (Divyanka Sirohi Dies) अख्खा देश हादरला आहे.
दिव्यांका सिरोही हिच्या अचानक झालेल्या निधनामुळे हरियाणवी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मंगळवारी उशिरा रात्री घरीच तिला हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीनं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत फारच उशिर झालेला. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. लाडक्या अभिनेत्रीचं असं जाणं, तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय. अनेक कलाकारांनी अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्यावर बुधवारी सकाळी गाझियाबाद इथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
लहान वयातच दिव्यांकानं आपल्या मेहनतीच्या जोरावर हरियाणवी इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली होती. बुलंदशहरची रहिवासी असलेल्या दिव्यांका हिनं आपल्या करिअरमध्ये लोकप्रिय कलाकार मासूम शर्मा (Masoom Sharma) यांच्यासोबतही काम केलं होतं. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली होती.
दिव्यांका सिरोही हिचा जन्म 19 नोव्हेंबर 1996 रोजी झाला. तिनं मेरठ येथील चौधरी चरण सिंह विद्यापीठातून BCA पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर सिक्कीम मणिपाल विद्यापीठातून MBA पदवी मिळवली. दिव्यांकाच्या कुटुंबामध्ये तिचा भाऊ हिमांशू आणि बहिणी दीपांशू आणि जसमीत यांचा समावेश आहे.

दिव्यांका आपल्या कुटुंबासह गाझियाबादमध्ये राहायची.एका मुलाखतीत दिव्यांकानं आपल्या कारकिर्दीबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलेलं. ती म्हणालेली, "मला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची प्रचंड आवड होती. मी निळ्या रंगाचा सूट परिधान करून TikTok वर एक व्हिडीओ तयार केला होता, माझ्या चेहऱ्यावरील हावभावांमुळे तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला."
"त्या व्हिडीओला सुमारे 2 कोटी व्ह्यूज मिळालेले. त्यानंतर, TikTok वर माझे 50 लाख फॉलोअर्स झालेले..." दिव्यांकानं सांगितलं की, हा प्रसंग तिच्या कारकिर्दीसाठी टर्निंग पॉईंट ठरला. या घटनेनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्या तिचे Instagram वर सुमारे 13 लाख फॉलोअर्स आहेत.