आज बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती, तिथे देखील आज पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेसने देखील आपला उमेदवार दिला होता. काँग्रेसच्या वतीने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला. मात्र काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आज या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
राहुरी मतदारसंघात काय चित्र?
भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीत अक्षय कर्डिले हे महायुतीचे उमेदवार आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यामध्ये प्रमुख लढत असणार आहे. एकूण 374 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होणार असून, राहुरी मतदारसंघात 3 लाख 33 हजार 543 इतकी मतदारांची संख्या आहे.