'तिथे मला खूप वाईट अनुभव आला...'; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला आलेला 'तो' विचित्र अनुभव, नेमकं काय म्हणाली?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 23, 2026 12:13 PM

Poonam Chandorkar On Aai Kuthe Kay Karte Serial: छोट्या पडद्यावरील (Marathi Television World) गाजलेल्या मालिकांमध्ये (Marathi Serials) आवर्जुन समाविष्ट होणारी लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte). एका सामान्य गृहिणीच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या मालिकेच्या कथानकात तिचा संघर्ष, स्वाभिमान आणि नव्यानं उभं राहण्याच्या प्रवास अगदी प्रभावीपणे मांडला. नेमकं हेच प्रेक्षकांना भावलं आणि प्रेक्षकांनी मालिकेला भरभरुन प्रेम दिलं. सध्या या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीसुद्धा, अजूनही प्रेक्षकांच्या मनात या मालिकेच अढळ स्थान कायम आहे. मालिकेच्या कथानकाप्रमाणेच मालिकेमध्ये झळकलेल्या कलाकारांवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मालिकेतली प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या मालिकेत अरुंधतीच्या नणंदेची, म्हणजेच विशाखाची भूमिका अभिनेत्री पूनम चांदोरकर (Actress Poonam Chandorkar) हिनं साकारलेली. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना तिनं इंडस्ट्रीत आलेल्या वाईट अनुभवांवर भाष्य केलंय. 

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पूनम शिक्षिका म्हणून काम करत होती. त्याचबरोबर तिनं काही जाहिरातींमध्येही भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना तिनं आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या काही नकारात्मक अनुभवांवर भाष्य केलंय. 

अभिनेत्री पूनम चांदोरकर हिनं नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिनं इंडस्ट्रीत आलेल्या वाईट अनुभवांवर भाष्य केलंय. तसेच, तिनं तिचा आजवरचा प्रवासही सांगितला. मालिकाविश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी पूनमनं शिक्षिकेची नोकरी केलेली. तसंच, तिनं काही जाहिरातींमध्येही काम केलेलं. मालिकाविश्वात पदार्पण केलं त्यावेळी ती दूरदर्शमध्येही काम करत होती. 

अभिनेत्री पूनम चांदोरकर काय म्हणाली?

अभिनेत्री पूनम चांदोरकर म्हणाली की, "जेव्हा मी दूरदर्शन करायला लागले तेव्हा श्वेता पेंडसे, मृणाल दुसानिस यांची एक मालिका होती. ती माझी पहिली मालिका म्हणता येईल. मी आता त्या मालिकेचं नाव घेत नाही पण, त्यामध्ये मला ऑफिसमधील मुलीचा रोल होता. तो रोल चांगला आहे, तुझ्या दुरदर्शनच्या तारखा सांभाळून घेऊ असं सांगण्यात आलेलं. पण, तिथे मला खूप वाईट अनुभव आला. मला तेव्हा इंडस्ट्री कशी आहे याबद्दल माहिती नव्हती."

"शिवाय सुरुवातीला माझ्यात संयम कमी होता. सकाळी बोलावलं असेल आणि संध्याकाळी सीन लागला तर तेव्हा चिडचिड व्हायची. पण, अशावेळी आपल्या सहकलाकारांकडून कळतं की, आपण एकदा दिवस दिला की दिला मग आपण शांत राहायचं. मला वाचनाची फार आवड होती. त्यामुळे मी पुस्तकं वाचत बसायचे. तिथे बऱ्याच गोष्टी मला खटकल्या. माझ्या दूरदर्शनच्या तारखा ॲडजस्ट होत नव्हत्या. अचानक न सांगता मालिकेतून रिप्लेस करण्यात आलं. अशा काही गोष्टी पण घडल्या. त्यामुळे मला इंडस्ट्रीत अशीच वागणूक मिळते का? हा प्रश्न पडला.पण, पुढे जाहिरातीत काम करायला सुरवात केली तेव्हा माझा अनुभव खूपच चांगला होता. तिथे आदर दिला जातो, चांगले पैसे मिळतात.", असं अभिनेत्री पूनम चांदोरकर म्हणाली. 

Archana Puran Singh On Not Getting Work: 'कुणीच काम देईना...', 'कपिल शर्मा शो'मध्ये खुर्चीवर बसून फक्त हसणाऱ्या अर्चना पूरन सिंहचं करिअर बर्बाद; जाहीरपणे बोलून दाखवली खंत

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.