ढिंग टांग : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..!
esakal April 23, 2026 07:45 AM

सुभाषिते आम्हाला नवीन नाहीत. उपदेशपर सुविचार हा तर आमचा हातखंडा विषय आहे. उच्चारण मनात असावे, आणि आचरण जनात असावे, हाही एक सुविचार आम्हाला तोंडपाठ आहे. किंबहुना, महानायक सुभाषचंद्र बोस यांनी काढलेल्या उद्गारांनाच सुभाषिते म्हणतात, असे आम्हाला बरेच दिवस वाटत होते. तो गैरसमज दूर झाला हे सुदैव. असो.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधु वोळखावा, देव तेथेचि जाणावा॥ असे श्रीतुकडोजी महाराजांनी पूर्वीच म्हणून ठेवले आहे. आम्ही तो सुविचार मनात ठेवला, आणि आचरण जनात ठेवले. वर्तमानकाळात आमच्या सुभाषितांच्या संग्रहाला टफ फाइट देईल, असा एकमेव क्यांडिडेट आम्हाला दिसतो. ते दुसरे तिसरे कोणीही नसून उत्तर प्रदेशचे पंतप्रधान परमश्रद्धेय श्रीमान श्रीश्री योगीजी आदित्यनाथजी हे होत. त्यांच्या मुखातून (बाहेर) पडलेला हरेक हुंकार हे सुभाषितच असते. त्यांनी चालवलेला हरेक बुलडोझर हा दुष्टांचा नायनाट करणारा महारथ असतो. आमचे तयांना वंदन असो.

‘तुम मुझे खून दोन मैं तुझे आजादी दूंगा’ हे स्वामी विवेकानंदांनी १८९३ मध्ये शिकागोतील धर्मपरिषदेत काढलेले अजरामर उद्गार कोणाला माहीत नाहीत? हरेक शिकागोवासीयांच्या ते मनात कोरले गेले आहे. आजही शिकागोत तुम्ही गेलात तर हे सुभाषित तुम्हाला जागोजाग कोरून ठेवलेले आढळेल. स्वामीजींचे हे उद्गार आम्हाला खुद्द योगीजींनीच (छातीवर हाताची घडी घालून आकाशीच्या चंद्राकडे बघत) सांगितले, म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंदजी काय सांगतात ते ऐका! तुम्ही खरं तर मुळातून विवेकानंदजींचं तत्वज्ञान वाचलं पाहिजे. वाचलं का कधी?’’

‘‘वाचाल तर वाचाल! वाचनरुपी भ्रमरामुळे जाणीवरुपी फुलांचे परागीकरण होऊन संस्कृती आणि बुद्धीचे वर्धन होते..,’’ उत्तरादाखल आम्हीही दोन सुविचार दणादण तोफगोळ्यासारखे डागले. आम्ही काही कमी नाही, हे वर सांगितलेच. आमची तयारी बघून योगीजी थोडे दचकले आणि हाताची घडी आणखी घट्ट करून ते फक्त ‘हं’ येवढेच म्हणाले.

‘‘तुमची सुभाषितांची तयारी चांगली दिसते! तुम्ही राहता कुठे?,’’ संशयाने योगीजींनी विचारले. हाताची घडी आता अशक्य घट्ट झाली होती.

‘‘ छे हो, ‘झूट बोले कौव्वा काटे, काले कौव्वेसे डरिओ’ असे सुश्री डिंपलजींनी फार पूर्वीच सांगून ठेवलंय...नाही का?’’ आम्ही उप्पर एक दुर्री दिली.

‘‘माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स...हे संबोधन कुणी वापरलं?,’’ योगीजींनी आमची परीक्षा घेण्याचे ठरवले असावे.

‘‘पं. जवाहरलाल नेहरुजींनी लखनौमध्ये १९७२ मध्ये!’’ आम्ही शांतपणे अचूक उत्तर दिले.

‘‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच, हे उद्गार कोणाचे?,’’ योगीजींनी दुसरी फैर झाडली.

‘‘सुबोध भावेच्या एका चित्रपटातला डायलॉग आहे,’’ आम्ही आत्मविश्वासाने सांगितले. पैकीच्या पैकी मार्क!

‘‘कभी कभी लगता है की मैं बायोलॉजिकल नहीं हूं, हे अजरामर उद्गार कुणाचे?’’ योगीजींनी तिसरी फैर झाडली. आम्ही तयारच होतो.

‘‘भारतीय आत्म्याचे! नैनं दहति शस्त्राणि, नैनं दहति पावक:...आत्मा बायोलॉजिकल नसतो!,’’ आम्ही कचकावून उत्तर दिले. योगीजींचा एव्हाना धीर सुटला असावा.

‘‘परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम...हे सुभाषित कुठलं आहे?,’’ त्यांनी आता हात सोडले होते...

‘‘नमो नम:!’’ वंदन करून मान तुकवून आम्ही उत्तर दिले. योगीजी जागच्या जागी खलास!

‘‘शाबाश, तुमचा ॲड्रेस देऊन ठेवा!,’’ पाठीवर थाप मारत ते म्हणाले.

...आम्ही दिल्लीतला एक मोठा पत्ता खरडून त्यांच्या हातावर ठेवला. म्हटले, चालवा लेको बुल्डोझर! जय हो!!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.